उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यातील एका महिलेला तिच्या पतीने व्हॉट्सॲप वरून तिहेरी तलाक दिला आहे. या महिलेने आपल्या आजारी भावाला वाचविण्यासाठी मूत्रपिंड (किडनी) दान केले होते. त्यानंतर तिच्या पतीने तिहेरी तलाक दिला. पीडितेचे नाव तरन्नुम असून तिचा पती मोहम्मद रशीद हा सौदी अरेबियामध्ये नोकरी करतो. तरन्नुमने पतीला न विचारता भावाला मूत्रपिंड दान केले, याचा राग धरून त्याने पत्नीकडे ४० लाख रुपयांची मागणी केली. मात्र पत्नीने पैसे देण्यास नकार दिल असता मोहम्मद रशीदने ३० ऑगस्ट रोजी व्हॉट्सॲपवर तिहेरी तलाक देत असल्याचा संदेश पाठविला.

तरन्नुम आणि रशीद यांचे २० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर रशीद सौदी अरेबियाला कामानिमित्त गेले. या दाम्पत्याला मूल झालेले नाही. तसेच रशीद यांनी दुसरे लग्न केलेले आहे, अशी माहिती तरन्नुमने दिली.

तरन्नुमचा भाऊ मोहम्मद शाकीरचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. त्याचे आयुष्य वाचविण्यासाठी तरन्नुमने आपल्या भावाला मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. पाच महिन्यांपूर्वी शाकीरवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तरन्नुम काही दिवसांनी गोंडा जिल्ह्यातील सासरच्या घरी परतली. तिथे गेल्यानंतर सासरची मंडळी आणि नवऱ्याशी तिचे वाद झाले. नवऱ्याने व्हॉट्सॲपवरूनच तिला तिहेरी तलाक देऊन टाकला.

घटस्फोट दिल्यानंतर तरन्नुमला माहेर जाण्यास बळजबरी करण्यात आली. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल करून सासरच्या लोकांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधेश्याम राय यांनी याबद्दलची तक्रार दाखल करून घेतली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

हे वाचा >> ‘तिहेरी तलाक’च्या प्रकरणांत ८० टक्के घट ; पंतप्रधान मोदी यांच्याकडून महिला सक्षमीकरणाची ग्वाही

भारतात तिहेरी तलाकवर बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने २०१९ साली कायदा संमत करून तिहेरी तलाकवर बंदी आणली आहे. “एका मध्ययुगीन रानटी प्रथेला आज इतिहासाने कचऱ्यात जमा केले आहे. मुस्लीम महिलांवर झालेल्या अन्यायाचे आता निवारण झाले आहे. समानतेसाठीच्या महिलांच्या लढय़ाचा हा विजय असून याने समाजात समतेलाच वाव मिळणार आहे. देश हा दिवस साजरा करीत आहे”, अशी प्रतिक्रिया कायदा मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती.

तिहेरी तलाक बंदी कायद्यातील तरतुदी काय आहेत?

१) या कायद्यानुसार, मुस्लिम पतीने आपल्या पत्नीला तलाक-ए-बद्दत अंतर्गत तोंडी, लेखी, ई-मेल अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिहेरी तलाकद्वारे दिलेला घटस्फोट बेकायदेशीर ठरणार आहे.

२) तिहेरी तलाक देणाऱ्या संबंधीत पतीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊन ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण देशभरात हा कायदा लागू होणार आहे.

३) नव्या कायद्यानुसार, घटस्फोटित मुस्लिम महिलेला आणि तिच्यावर अवलंबून असणाऱ्या पाल्याला तसेच संबंधीत जोडप्याच्या अल्पवयीन मुलांच्या संरक्षण हक्कांतर्गत पतीला निर्वाह भत्ता देणे बंधनकारक असणार आहे.

४) या कायद्यानुसार, मुस्लीम जोडप्याच्या घटस्फोटानंतर त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या संगोपणासाठी त्यांचा ताबा महिलेकडे असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) मुस्लिम महिलांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी हा कायदा वरदान ठरणार आहे.