पाटणा : बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) वरिष्ठ नेते उपेंद्र कुशवाह यांनी सोमवारी उघडपणे सहकारी पक्ष भाजपला टीकेचे लक्ष्य केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी बिहार झपाटय़ाने देशविरोधी दहशतवादी कारवायांचे केंद्र बनत असल्याची टीका केली होती. यावर भाजप नेत्यांनी बेताल वक्तव्ये टाळावीत, असे सांगत संयुक्त जनता दलाच्या विधिमंडळ पक्षाचे अध्यक्ष कुशवाह यांनी प्रत्युत्तर दिले.

पत्रकारांशी बोलताना कुशवाह म्हणाले, की दोन्ही पक्षांत वादाचा कोणताही मोठा मुद्दा नाही. परंतु भाजप नेत्यांच्या विधानांमुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात. मित्रपक्ष भाजपच्या नेत्यांनी बेताल वक्तव्ये करणे टाळावे. बिहारमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पीएफआय) दहशतवादी यंत्रणेची पाळेमुळे उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडय़ात जयस्वाल यांच्या टीकेबद्दल विचारले असता, कुशवाह यांनी उपहासाने सांगितले, की, ते ज्या पद्धतीने बोलतात त्यावरून त्यांना प्रशासनापेक्षा वस्तुस्थिती अधिक माहिती असल्याचे दिसते. तसे असल्यास त्यांनी आपली माहिती अधिकाऱ्यांना द्यावी. त्याच्यावर संवेदनशील माहिती लपवल्याचा आरोप होऊ नये. दहशतवादी कारवायांची केंद्रे सापडल्यामुळे बिहारमध्ये कोणताही धोका नाही. यापूर्वी अनेक राज्यांत असे प्रकार उघडकीस आले आहेत. उपलब्ध माहितीद्वारे कारवाई करण्यात येत आहे.  राज्यात शांतता नांदण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

सर्वाधिक काळ बिहारच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या नितीश कुमार यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून जयस्वाल यांच्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे. तत्पूर्वी, त्यांनी केंद्रीय निधीच्या विनियोगात अपयशी ठरल्याबद्दल, भाजपला लक्ष्य करणाऱ्या ‘अग्निपथ’विरोधी आंदोलकांवरील नियंत्रणासाठी अपुऱ्या पोलीस दलाचा वापर आणि लोकसंख्यानियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत अनास्था या मुद्दय़ांवरून सरकारवर टीका केली होती.

नितीशकुमार नाराज नाहीत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळय़ाला न जाण्याचा नितीश यांचा निर्णय भाजपवरील नाराजीमुळेच घेण्यात आल्याचे कुशवाह यांनी फेटाळून लावले. याबाबत त्यांनी स्पष्ट केले, की प्रत्येक कार्यक्रमाला सर्वानी हजेरी लावण्याची गरज नाही. राष्ट्रपतींची आधीच निवड झाली आहे. शपथविधी ही केवळ औपचारिकता होती. त्याला मुख्यमंत्री किंवा अन्य कोणी जात नाही, ही चर्चेची बाब होऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांकडे खूप काम असल्याने ते जाऊ शकले नसतील.

या आठवडय़ाच्या अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नियोजित बिहार भेटीबद्दल विचारले असता, कुशवाह म्हणाले, आम्हाला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. ते त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. यापूर्वी कुशवाह यांनी सांगितले होते, की नितीशकुमार हे नि:शंकपणे बिहारमधील प्रभावशाली नेते आहेत. कुशवाह यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि वर्षभराने येणाऱ्या २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुका भाजपसह एकत्र लढवणार का असे विचारले असता, आगामी काळात काय होईल, हे कोण सांगू शकेल? असा सवालच त्यांनी केला.