दिल्लीमध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या एका कार्यक्रमात गोंधळ घातल्यामुळे एका व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी बळजबरीने सभागृहाच्या बाहेर काढले. विज्ञान भवनमध्ये यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि डॉ. सिंग यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू असतानाच अचानक हा प्रकार घडल्याने काहीवेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
डॉ. सिंग यांनी कार्यक्रमातील आपल्या भाषणामध्ये अल्पसंख्य समाजासाठी केंद्र सरकार नव्या योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. डॉ. फहीम बेग नावाच्या व्यक्तीने त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत आपल्या जागेवरूनच पंतप्रधानांकडे बघत बोलण्यास सुरुवात केली. ज्या योजना अस्तित्त्वात आहेत, त्याची अंमलबजावणी नीट केली, तर नव्या योजनांची गरजच नाही, असे बेग सांगत होते. पंतप्रधानांकडे बघत बोलत असतानाच सुरक्षारक्षकांनी बेग यांना सभागृहातून बाहेर नेले. बाहेर नेतानाही ते सातत्याने काहीतरी बोलत होते. त्यामुळे शेवटी एका सुरक्षारक्षकाने त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि इतरांनी त्यांना धरून बाहेर काढले.
सभागृहाबाहेर बेग पत्रकारांना म्हणाले, मी दिल्लीजवळ राहणार आहे. आमच्या भागात अल्पसंख्य विकासाचे कोणतेही काम झालेले नाही. यासंदर्भात मी सातत्याने पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहित आहेत. मात्र, माझ्या कोणत्याच पत्राला उत्तरही देण्यात आले नाही.