पीटीआय, नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) परीक्षा, भरतीसंदर्भातील माहिती देणारे मोबाइल उपयोजन (अ‍ॅप) कार्यान्वित करण्यात आले आहे. हे ‘अँड्रॉइड मोबाइल उपयोजन’ असून, त्याद्वारे ही महत्त्वाची माहिती इच्छुकांना सहज मिळू शकेल, अशी माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. ‘गुगल प्ले स्टोअर’वर ते उपलब्ध असेल.

आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे, की मोबाइलच्या माध्यमातून परीक्षा व भरती प्रक्रियेची सर्वंकष माहिती देण्यासाठी आयोगाने ‘यूपीएससी अँड्रॉइड अ‍ॅप’ सुरू केले आहे. मात्र, याद्वारे कोणताही अर्ज भरता येणार नाही. हे ‘अ‍ॅप’  https://play.google.com/store/apps/details?id=com.upsc.upsc  या ‘लिंक’वरून घेता येईल. ‘यूपएससी’तर्फे प्रतिष्ठेच्या सनदी सेवा परीक्षेसह केंद्र सरकारी सेवातील विविध पदांसाठी परीक्षा घेतल्या जातात. हजारो उमेदवार या परीक्षांना बसतात.