US President Donald Trump On PM Modi : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं. तसेच रशियाकडून खजिन तेल खरेदी केल्याचा मुद्दा उपस्थित करत भारतावरही तब्बल ५० टक्के कराचं (टॅरिफ) ओझं टाकलं. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा भारताला टॅरिफच्या मुद्यांवरून डिवचण्याचाही प्रयत्न केला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाला भारताने जुमानलं नाही आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
असं असतानाच आता अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी पुन्हा एकदा भाष्य करत अमेरिका भारताशी व्यापार करार करणार की नाही? याविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे. हॉवर्ड लुटनिक यांनी पुन्हा एकदा संकेत दिले की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवल्यानंतरच भारताबरोबर अमेरिका व्यापार कराराच्या संदर्भाने पुढे जाऊ शकते. सीएनबीसीशी बोलताना हॉवर्ड लुटनिक यांनी हे भाष्य केल्याचं वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
हॉवर्ड लुटनिक यांनी काय म्हटलं?
“जेव्हा भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल, तेव्हा आम्ही त्यांच्यासोबतच्या सर्व समस्या सोडवू. पण भारताने रशियन तेल आयात बंद करावी, त्यावरच पुढील प्रगती अवलंबून आहे”, असं हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटलं आहे. दरम्यान, व्यापार आणि ऊर्जा धोरणांवरून भारत आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या तणावानंतर लुटनिक यांचं हे विधान समोर आलं असून अमेरिका-भारत संबंधांमधील तणाव कमी होण्याची शक्यता मानली जात आहे. कारण काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रिय मित्र असं संबोधलं होतं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे देखील नरमले असल्याचं बोललं जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं होतं?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी पहाटे त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी भारताशी पुन्हा एकदा व्यापाराची चर्चा आणि वाटाघाटी करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी बोलण्यासाठी मी उत्सुक असून, पुढील आठवड्यात आमची चर्चा होईल. मला खात्री आहे की, या दोन्ही महान देशांना निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही”, असं ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
दरम्यान, विशेष बाब म्हणजे गेल्या आठवड्यातही व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधानांचं कौतुक केलं होतं. “नरेंद्र मोदी हे महान पंतप्रधान असून, ते आपले नेहमीच चांगले मित्र राहतील. सध्या त्यांची भूमिका मला आवडत नसली तरी भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले राहतील”, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं होतं.
पंतप्रधान मोदींनी कसा प्रतिसाद दिला होता?
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात नरमाईची भूमिका घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या पोस्टला सकारात्मक प्रतिसाद दिला. “भारत आणि अमेरिका हे जवळचे मित्र असून, नैसर्गिक भागीदार आहेत. आमच्यातील व्यापार वाटाघाटीच्या चर्चेतून भारत-अमेरिकेमधील भागीदारीची अमर्याद क्षमता निर्माण होईल, असा मला विश्वास आहे. आमचे पथक लवकरच ही चर्चा पूर्ण करण्यासाठी काम करीत आहे. मी देखील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलण्यास उत्सुक आहे. आम्ही आमच्या दोन्ही देशांतील लोकांचे उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य सुरक्षित करण्यासाठी एकत्र काम करू. मला खात्री आहे की, या चर्चेतून दोन्ही महान देशांसाठी चांगला आणि यशस्वी तोडगा निघेल,” असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.