अमेरिकेच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेत हलकल्लोळ निर्माण होईल असा निर्णय अमेरिकेतील एका न्यायालयाने दिला आहे. यूएस कोर्ट ऑफ अपील्स द फेडरल सर्किट यांचं म्हणणं आहे की ट्रम्प यांनी लादलेले बहुतांश टॅरिफ हे बेकायदेशीर आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणीबाणीच्या परिस्थितीतले अधिकार प्राप्त आहेत पण त्यामध्ये टॅरिफ लादण्याचा अधिकार नाही. या निर्णयानंतर अमेरिकेच्या आर्थिक धोरणांना फटका बसला आहे. एपीने दिलेल्या वृत्तानुसार कोर्टाने टॅरिफ १४ ऑक्टोबरपर्यंत सद्यस्थितीत ठेवण्याची संमती दिली आहे. मात्र या निर्णयामुळे ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. हा निर्णय उद्ध्वस्त करणार असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलंय?
न्यायालयाचा निर्णय हा आपल्याला उद्ध्वस्त करणारा आहे अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा आम्ही ठोठावू आमि टॅरिफचा उपयोग राष्ट्रहितासाठी करु असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर कोर्टाने निर्णय दिला म्हणजे टॅरिफ रद्द झाले असं नाही. सगळे टॅरिफ लागू आहेत. अपील न्यायालयाने अत्यंत चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला आणि टॅरिफ बेकायदेशीर असून ते हटवले पाहिजेत असं म्हटलं आहे. पण त्या न्यायालयालाही हे माहीत आहे की शेवटी विजय आमचा होणार आहे. जर टॅरिफ हटवले गेले तर अमेरिकेसाठी मोठं संकट निर्माण होईल असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
टॅरिफचा उपयोग राष्ट्रहितासाठी करणार-ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की लेबर डे च्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की टॅरिफ हे आपल्या देशातील मजुरांच्या हिताचं आहे. अमेरिकेत उत्तम उत्पादनं घेणाऱ्या कंपन्यांसाठीही टॅरिफ महत्त्वाचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण जो निष्काळजीपणा केला आणि अनेक अर्धवट ज्ञानी लोकांनी टॅरिफचा उपयोग आपल्या विरोधात होऊ दिला तसं आपल्याला करायचं नाही. आता आम्ही कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आहोत. टॅरिफचा उपयोग आम्ही राष्ट्रहितांसाठी करणार आहोत. अमेरिका पु्न्हा एकदा एक समृद्ध आणि सर्वशक्तिमान देश होईल याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं कोर्टाचं मत
अमेरिकेतील अपील न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही त्यामुळे त्यांनी लागू केलेले टॅरिफ हे बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा निर्णय झटका मानला जातो आहे. मात्र त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प प्रशासनाने काय म्हटलं आहे?
कोर्टाच्या निर्णयावर उत्तर देताना ट्रम्प प्रशासाने १९७७ ला काय घडलं होतं त्याचा हवाला दिला आहे. राष्ट्राध्यक्षांना असामान्य परिस्थितीत निर्णय घेण्याचे आणि त्याविरोधात पावलं उचलण्याचे अधिकार आहेत. ट्रम्प यांच्या आधी असे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले आहेत ज्यांनी IEEPA अर्थात इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर अॅक्टचा उपयोग टॅरिफ लावण्यासाठी केला आहे. १९७७ ला ही हे घडलं होतं असंही ट्रम्प प्रशासनाने म्हटलं आहे.