US Took Action Against The Resistance Front : अमेरिकन सरकराने द रेजिस्टन्स फ्रंट (टीआरएप) या संघटनेला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी याबाबतची माहिती दिली आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी याच संघटनेने घेतली होती. या संघटनेच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले होते.
द रेजिस्टन्स फ्रंट ही पाकिस्तानमधील कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबाचीच एक शाखा असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. ही संघटना सातत्याने काश्मीर खोऱ्यात कुरापती करत आहे. टीआरएफ लष्करचाच एक भाग असल्याच्या वृत्तांवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. संयुक्त राष्ट्राने देखील टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. या संघटनेचं मुख्यालय पाकिस्तानमध्ये आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिका गंभीर
रुबियो यांनी एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित करण्याचा निर्णय आपल्या राष्ट्रीय संरक्षण हितांसाठी, दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच हा निर्णय पहलगाममधील हल्ल्यानंतर पीडितांच्या न्यायासाठी आपली वचनबद्धता दर्शवतो. टीआरएफने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. लष्करने २००८ मध्ये मुंबईवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सामान्य नागरिकांवर केलेला हा दुसरा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता असंही अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
टीआरएफला दहशतवादी संघटना ठरवल्यामुळे काय होणार?
अमेरिकेने टीआरएफ ही संघटना फॉरेन टेरर ऑउटफिट असल्याची घोषणा केल्यानंतर आता या संघटनेची आर्थिक नाकेबंदी केली जाईल. या संघटनेवर आर्थिक व प्रवासी निर्बंध लागू केले जातील. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटलं आहे की यामुळे दहशतवादविरोधी प्रयत्नांमध्ये जागतिक भागीदारांबरोबर वॉशिंग्टनचे सहकार्य आणखी मजबूत होईल. टीआरएफचा भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांशी संबंध आहे.
तीन महिन्यांपूर्वी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात २६ जण ठार झाले होते. या मारेकऱ्यांनी काही लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबवली होती.