अमेरिकेतील राजकारण रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोनच पक्षांपुरते राखण्याच्या विरोधात बहुतांश अमेरिकन नागरिकांचा कौल असून ताज्या पाहणीत तो उघड झाला आहे. लोकांचे प्रतिनिधित्व करण्यात हे दोन्ही पक्ष अपयशी ठरत असल्यामुळे अमेरिकी राजकारणात तिसऱ्या पक्षाचा प्रवेश आवश्यक झाला आहे, असे बहुतांश प्रौढ नागरिकांनी नमूद केले आहे.
रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन्ही पक्ष अमेरिकन नागरिकांचे योग्य प्रतिनिधित्व करीत आहेत की तिसऱ्या पक्षाची गरज तुम्हाला वाटत आहे, या प्रश्नावर ५८ टक्के लोकांनी तिसऱ्या पक्षाला पाठिंबा दिला. ३५ टक्के लोकांना दोन्ही पक्ष योग्य काम करीत असल्याचे वाटते. सात टक्के लोकांनी कोणतेही मत दिले नाही.
विशेष म्हणजे २००७ पासूनच्या चाचण्यांत डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने कौल आला आहे. २०११च्या चाचणीत रिपब्लिकन पक्षाचा जनाधार ५० टक्क्य़ांपर्यंत गेला. तरीही २००७पासूनच्या प्रत्येक चाचणीत तिसऱ्या पक्षाची गरजही मांडली जात आहेत.