मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि ‘जमात-उद-दावा’चा म्होरक्या हाफिज सईदच्या ‘मिल्ली मुस्लिम लीग’ या राजकीय पक्षाला अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. याशिवाय ‘तेहरिक- ए- आझादी ए काश्मीर’ या संघटनेलाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेने मंगळवारी हाफिज सईदच्या ‘मिल्ली मुस्लिम लीग’ या राजकीय पक्षाला दणका दिला.  ‘मिल्ली मुस्लिम लीग’ला दहशतवादी संघटना आणि त्याच्याशी संबंधित  सात जणांना अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले. ‘लष्कर ए तोयबा’चे डाव उधळून लावून त्यांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ही कारवाई केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. लष्कर- ए- तोयबाने स्वत:ला काही देखील म्हणावे. पण ती एक दहशतवादी संघटनाच आहे. अमेरिका ‘लष्कर’ला राजकारणात येऊ देणार नाही, असे अमेरिकेच्या काऊंटर टेररिझमचे समन्वयक नॅथन सेल्स यांनी सांगितले. या कारवाईनंतर आता अमेरिकेला ‘लष्कर’च्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करता येणार आहे. ‘लष्कर’ पाकिस्तानमध्ये अजूनही सक्रीय असून ते पाकमध्ये सभा घेतात, निधी गोळा करतात आणि दहशतवादी हल्ल्यांचे प्रशिक्षणही देतात, असे सांगत त्यांनी पाकला खडे बोल सुनावले.

दरम्यान, यापूर्वी हाफिज सईदच्या ‘मिल्ली मुस्लिम लीग’ने पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. हाफिज सईदने केलेल्या या अर्जावर पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने जोरदार आक्षेप घेतला होता. दहशतवादी संघटनांशी संबंध असलेल्या एखाद्या संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता कशी काय मिळू शकते, असा आक्षेप गृह मंत्रालयाकडून नोंदवण्यात आला होता. यानंतर निवडणूक आयोगाकडून हाफिज सईदचा अर्ज रद्द करण्यात आला होता. यापाठोपाठ आता अमेरिकेच्या कारवाईमुळे सईदची कोंडी झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us designates hafiz saeed political front milli muslim league as terrorist organisation
First published on: 03-04-2018 at 09:28 IST