Donald Trump Tariff : अमेरिका आणि भारत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून व्यापारी तणाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादला आहे. यादरम्यान अमेरिकेने भारतावर इतका जास्त ट्रॅरिफ का लादला यामागचे मूळ कारण समोर आले आहे. अमेरिकेतील एका फायनान्स सर्व्हिसेस कंपनीने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नवी दिल्लीने नाकारली, ज्यामुळे ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठीची दावेदारी मजबूत करण्याची संधी हातातून गेली, याचा परिणाम म्हणून वैयक्तिक रागातून ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादले.
जेफरिज (Jefferies) च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने इतर व्यापार भागिदारांच्या तुलनेत भारतावर सर्वाधिक म्हणजेच ५० टक्के टॅरिफ लादण्याचे कारण हे ट्रम्प यांचा वैयक्तिक राग आहे, आणि यामुळे दीर्घकाळापासून असलेले धोरणात्मक संबंध आता घसरणीला लागले आहेत. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “भारत आणि पाकिस्तान यांच्याती दीर्घकाळापासून चालत असलेला तणाव संपवण्याच्या प्रयत्नांदरम्यान त्यांची भूमिका नाकारण्यात आल्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक रागाचा टॅरिफ हा परिणाम आहे.”
भारताने पाकिस्तानबरोबर काश्मीरच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या संघर्षात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी सातत्याने नाकारली आहे. भारताची भूमिका अगदी स्पष्ट असताना देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संघर्ष आपण संपवल्याचा वारंवार दावा केला. दोन्ही देशांमधील अण्वस्त्र युद्ध थांबवले, तसेच त्यांनी शस्त्रविरामावर सहमती दाखवली नाही तर त्यांच्यावर टॅरिफ लादले जाईल अशी धमकी दिल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. पाकिस्तानशी थेट चर्चा झाल्यानंतरच शस्त्रविराम झाल्याची भूमिका भारताने मांडली आहे.
जेफरीजच्या रिपोर्टनुसार दुसरा एक मुद्दा हा शेतीचा होता. ट्रम्प प्रशासन भारताच्या कृषी आणि दुध बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यासाठी भारत सरकार तयार नाही. मार्चपासून चर्चेत असलेला द्विपक्षीय व्यापार करार यामुळे रखडला आहे.
भारत-अमेरिका व्यापार करार
डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेला अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आणि रखडलेला व्यापार करार यामुळे भारत अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. यादरम्यान भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अतिरिक्त २५ टक्के टॅरिफचा प्रश्न सुटल्यानंतरच अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावरील वाटाघाटी पुन्हा सुरू होऊ शकतात असे म्हटले आहे.
अमेरिका व्यापार कराराच्या चर्चा सुरू ठेवण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी एक पथक भारतात येणार होते, परंतु राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियन तेल खरेदी करणे ही करार मोडणारी कृती असल्याचे म्हणत ही चर्चा थांबवली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती.
“आम्ही सध्या व्यापार करारावर वाटाघाटी करत नसलो तरी अजूनही चर्चा सुरू आहे. करारावर वाटाघाटी करताना पहिल्यांदा अतिरिक्त २५ टक्के टॅरिफचा प्रश्न सुटला पाहिजे. कारण जर आम्ही व्यापार करार केला आणि अतिरिक्त टॅरिफ कायम राहिले तर आपल्या निर्यातदारांच्या दृष्टीने याला काहीच अर्थ राहणार नाही”, असे अधिकाऱ्याने सांगितले.