US economist jeffrey sachs on Donald Trump tariffs : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारत याच्यातील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. याचे कारण ट्रम्प यांनी भारतीय निर्यातीवर लादलेले ५० टक्के शुल्क हे आहे. हे शुल्क २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. यादरम्यान प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेले शुल्क मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच हे शुल्क काहीह साध्य करत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांना भ्रमात असल्याचे सांगत सॅक्स म्हणाले की अमेरिकेने इतका जास्त काळ वर्चस्व गाजवले आहे की त्यांना वाटते की ते जगात प्रत्येक ठिकाणी ते दादागिरी करू शकतात. “याला काही अर्थ नाही. ते खरे नाही. हे अपयशी ठरत आहे. अगदी कोणत्याही निकषांनुसार भारतावर अतिरिक्त शुल्क लादणे हे अत्यंत मूर्खपणाचे होते. यामुळे काहीही साध्य होणार नाही,” असे सॅक्स एएनआयशी बोलताना म्हणाले.

सॅक्स पुढे म्हणाले की, ट्रम्प हे BRICS संघटनेचा द्वेष करतात कारण हे देश अमेरिकेच्या विरोधात उभे राहून वॉशिंग्टन जग चालवत नाही असे ठणकावून सांगतात. “या टॅरिफबद्दलची प्रत्येक गोष्ट चुकीची आहे. ते अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी विघातक आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करते. हा आपल्या राजकीय व्यवस्थेतील बिघाड आहे. ट्रम्प यांची धोरणे निश्चितपणे अपयशी ठरणार आहेत,” असेही सॅक्स पुढे म्हणाले.

जेफ्री सॅक्स यांच्या मते, भारताने अमेरिकेवर विश्वास ठेवू नये आणि नवी दिल्ली ग्लोबल व्हॅल्यू चेनमध्ये चीनची जागा घेईल असेही समजू नये. तसेच त्यांनी चीन, रशिया आणि ब्राझिल हे भारताचे खरे भागिदार आहेत असेही यावेळी सांगतले.

काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सॅक्स म्हणाले होते की, “अमरिकेतील राजकारण्यांनी हे समजून घेतले पाहिजे. त्यांना भारताची काहीही पर्वा नाही. भारत ही एक मोठी शक्ती आहे, त्यांचे जगात स्वतंत्र स्थान आहे. चीनविरोधात अमेरिकेच्या बाजूने उभे राहून भारताला दीर्घकालीन सुरक्षितता मिळणार नाहीये. ट्रम्प टॅरिफबाबत जे काही करत आहेत, ते असंवैधानिक आहे.”