इराकमधील ‘इस्लामिक स्टेट’ दहशतवाद्यांच्या विरोधातील पहिला हवाई हल्ला फ्रान्सच्या विमानांनी शुक्रवारी चढवला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त करण्यात यश आल्याचे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कोस होलांदे यांनी सांगितले. भविष्यात दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आणखी हल्ले चढवण्यात येतील, असेही या वेळी स्पष्ट केले.
शुक्रवारी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी ‘राफेल’ विमानांनी ईशान्य इराकमधील ‘इस्लामिक स्टेट’च्या दहशतवाद्यांच्या सामग्री तळांवर हल्ला चढवला. हे हल्ले यशस्वी ठरले आहेत, असे होलांदे यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. सरकारी निवेदनात फ्रान्सने ‘इस्लामिक स्टेट’ला ‘अतिरेकी गट’ संबोधले आहे.
येत्या काळात इराकमध्ये आणखी काही हल्ले चढवले जातील, असेही होलांदे यांच्या ‘एलीसी पॅलेस’मधून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
फ्रान्स सेनेच्या स्थितीबद्दलची माहिती येत्या आठवडय़ात संसदेला देण्यात येईल. इराकमध्ये फ्रान्स सेनेसोबत कुर्दिश सैन्य लढत आहे. इराकमधील निम्म्याहून अधिक हिंसाचारग्रस्त भाग दहशतवाद्यांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यांच्याविरोधात लढण्यासाठी फ्रान्स तेथील सैन्याला ‘हवाई यंत्रणे’च्या माध्यामातून मदत करील, अशी हमी दिली होती. इराकमधील सरकारने आमच्याकडे तशी मागितली आणि त्याला प्रतिसाद दिला, असे होलांदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. इराकमधील तळ आमच्या दृष्टिक्षेपात जसजसे येतील तशी हल्ल्यांची तीव्रता वाढवली जाईल आणि हे सारे खूपच कमी वेळेत केले जाईल, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. गेल्याच आठवडय़ात होलांदे यांनी इराकला भेट दिली होती. तरीही त्यांनी इराकमधील फ्रान्सची कारवाई ही मर्यादित राहील असे स्पष्ट केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onआयसिसISIS
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us hits isis position
First published on: 20-09-2014 at 02:17 IST