वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षातील प्रतिस्पर्धी जो बिदेन यांना हानी पोहोचवण्यासाठी परदेशी शक्तींशी संधान बांधल्याच्या आरोपावरून अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक नेत्या व प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी महाभियोगाची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रम्प यांनी चुकीचे कृत्य करून पदाच्या शपथेचा विश्वासघात केला असून त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात येत आहे असे पेलोसी यांनी म्हटले आहे.

महाभियोगाच्या गुंतागुतीच्या प्रक्रियेत प्राथमिक चौकशी हा पहिला टप्पा असून यात सध्यातरी ट्रम्प यांना पायउतार व्हावे लागण्याची शक्यता कमी आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीस चौदा महिने शिल्लक असताना ही महाभियोग प्रक्रिया सुरू केली असून त्यामुळे निवडणुकीत वेगळे रंग भरणार आहेत. ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रातील आमसभेत भाषणानंतर महाभियोगाच्या कारवाईबाबत सांगितले की, ही चौकशी सूडाची कचरापट्टी आहे.  त्यातून उलट आपली २०२० मध्ये पुन्हा अध्यक्ष होण्याची शक्यता वाढणार आहे. पेलोसी यांनी अपेक्षित असलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ट्रम्प यांनी अध्यक्ष म्हणून पदाच्या शपथेचा भंग केला आहे. राष्ट्रीय सुरक्षा व निवडणुकांतील एकात्मतेचा भंग केला आहे. त्यामुळे प्रतिनिधिगृह त्यांच्या विरोधात महाभियोगातील प्राथमिक चौकशी सुरू करीत आहे.

बिदेन यांना निवडणुकीत हानी पोहोचवण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनकडून मदत घेतली व नंतर त्यांना त्या बदल्यात अमेरिकेकडून वेगळ्या स्वरूपात मदत दिली. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही त्यामुळे यात अध्यक्षांना जबाबदार धरलेच पाहिजे. ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदायमीर झेलेनस्की यांच्यावर दबाव आणून त्यांना बिदेन व त्यांचे पुत्र हंटर यांची चौकशी सुरू करण्यास भाग पाडले. बिदेन व त्यांच्या मुलांचा युक्रेनमध्ये उद्योग व्यवसाय आहे याबाबत एका जागल्याने ट्रम्प यांनी २५ जुलैला झेलेन्स्की यांना केलेल्या फोन कॉलच्या आधारे तक्रार दिली होती. ट्रम्प यांनी या दूरध्वनीबाबत सांगितले की, तो मित्रत्वाच्या नात्याने केलेला फोन होता, त्यात कुणावर दबाव आणला नव्हता. जो बिदेन व त्यांच्या मुलाचा त्याच्याशी काही संबंध नाही. ट्रम्प यांनी ही अध्यक्षांची छळवणूक आहे असा आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्रात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात राजनैतिक चर्चा झाल्या, बरेच यश अमेरिकेला मिळाले व डेमोक्रॅटसनी हेतूत: चौकशीची घोषणा करून सूडाचे राजकारण केले त्यामुळे आमची संयुक्त राष्ट्रातील कामगिरी झाकोळण्याचा हा प्रयत्न आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी बिदेन यांच्या संदर्भाने चर्चा केल्याचे ट्रम्प यांनी मान्य केले असून  बिदेन यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावण्यासाठी त्यांना लाखो डॉलर्स दिल्याचा आरोप  त्यांना मान्य नाही. ट्रम्प यांनी त्या दूरध्वनी कॉलमधील माहिती उघड करण्याची तयारी दर्शवली पण त्याचा काही परिणाम डेमोक्रॅटसवर झाला नाही. त्यांनी चौकशी सुरू केली.  पेलोसी यांनी आता सुरू केलेली चौकशी प्राथमिक आहे त्यात जर ठोस पुरावे सापडले तर ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचे औपचारिक आरोप ठेवले जातील त्यानंतर सभागृहात त्यावर मतदान होईल. तो प्रस्ताव साध्या बहुमताने मंजूर होऊ शकतो. तेथून हा प्रस्ताव सिनेटकडे जाईल पण तेथे रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे.