एपी, सेऊल
दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानने उत्तर कोरियाला इशारा देताना एकत्रितपणे अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या हवाई कसरती केल्या. अण्वस्त्रे वाहून नेतील, अशा अमेरिकेच्या बी-५२एच बॉम्बरचा यामध्ये समावेश होता. उत्तर कोरियाने प्रादेशिक सुरक्षेला बाधा येईल, अशी कुठलीही बेकायदा कृती करू नये. अशा कृती तातडीने थांबवाव्यात, असा इशारा तिन्ही देशांच्या उच्च लष्कराधिकाऱ्यांनी उत्तर कोरियाला दिला आहे.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह शुक्रवारी उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर येणार होते. उत्तर कोरिया आणि रशियामध्ये लष्करी आणि इतर सहकार्य मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिन्ही देशांनी दोन्ही देशांतील सहकार्य आणि रशियाकडून उत्तर कोरियाला तंत्रज्ञान हस्तांतर यावर चर्चा केली.
जपानच्या विमानाजवळ चीनचे बॉम्बर
टोकियो: जपानच्या टेहळणी विमानाच्या जवळून चीनने त्यांची लढाऊ विमाने नेऊ नयेत, असे आवाहन जपानने चीनला केले आहे. चीनचे विमान अनेकदा जवळून गेले असून, दोन्ही विमानांची टक्कर होण्याचा धोका असल्याचे जपानने म्हटले आहे. जपानचे संरक्षणमंत्री म्हणाले, ‘चीनचे ‘जेएच-७’ लढाऊ बॉम्बर जपानच्या ‘वायएस-११ ईबी’ या गुप्तवार्ता संकलन करणाऱ्या विमानाजवळ ३० मीटरपर्यंत (९८ फूट) आले होते. ही घटना जपानच्या हवाई हद्दीबाहेर, पूर्व चीन समुद्रावर घडली. यात जपानचे कुठलेही नुकसान झाले नाही.’ चीनने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी चीनने जपानचे विमान चीनच्या विमानाजवळ आल्याची तक्रार केली होती.