US Man Asks Flight Attendant For Sex: विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गैरवर्तन केल्याचे निरनिराळे प्रकार समोर येत असतात. महागडे तिकीट काढून विमान प्रवास करणारे हे प्रवाशी माणुसकीलाही लाज वाटावी, इतके अश्लाघ्य कृत्य करताना दिसतात. मुंबईत काही महिन्यांपूर्वीच एका उच्च पदावर काम करणाऱ्या इसमाने वृद्ध महिलेच्या अंगावर लघूशंका केली होती. हे प्रकरण गाजल्यानंतर इतर प्रकरणांची चर्चा झाली. सध्या अमेरिकेतही अशाच एक प्रकार घडला आहे. न्यूजर्सी येथील इसमाने अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानात अशरक्षः धिंगाणा घातला. तसेच विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे कृत्य केले. त्यामुळे त्याला आता अटक करण्यात आली आहे.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या बातमीनुसार २६ वर्षीय एरिक निकोलस गॅप्को हा १८ जुलै रोजी सिएटल ते डॅलस असा प्रवास करत होता. यावेळी त्याने स्वतःचे कपडे उतरवून एअर होस्टेसकडे लैंगिक सुखाची मागणी केली. तसेच विमान हवेत असतानाच वारंवार विमानाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
एअर होस्टेसकडे लैंगिक सुखाची मागणी
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार न्यूयॉर्क पोस्टने आपल्या वृत्तात म्हटले की, गॅप्कोने त्याचा शर्ट उतरविला आणि तो अर्धनग्न अवस्थेत एअर होस्टेसकडे लैंगिक सुखाची मागणी करू लागला. इतर क्रू सदस्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅप्को आरडाओरड करत कुणालाही आवरत नव्हता, हे विमानातील व्हिडीओ फुटेजवरून दिसून आले आहे. यादरम्यान त्याने क्रू सदस्यांना मारहाण केल्याचेही सांगितले जात आहे.
या विमानातील व्हिडीओ आता समोर आले आहेत. ज्यामध्ये गॅप्क मोठ्याने ओरडताना दिसत आहे. त्याने स्वतःला विमानातील शौचालयातही कोंडून घेतलं होतं. गॅप्कोला नियंत्रणात आणण्यासाठी क्रू सदस्य आणि इतर काही प्रवाशांनी एकत्र येत त्याला एकाजागी पकडून ठेवलं. त्यानंतर विमान सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळविण्यात आले. तिथे विमान उतरताच गॅप्कोला अटक करण्यात आली. विमानतळावरही गॅप्कोने धिंगाणा सुरूच ठेला होता. चालता चालता त्याने एक काचेचा दरवाजा फोडला.
हे ही वाचा >> Anand Kumar : “येत्या १० ते १५ वर्षांत ९० टक्के ऑफलाइन कोचिंग सेंटर्स बंद होतील”, ‘सुपर ३०’ चे संस्थापक आनंद कुमार यांचा दावा
गांजाच्या १० गोळ्या खाऊन राडा
गॅप्कोवर आता विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्रू सदस्यांच्या कामात हस्तक्षेप करणे, विमानांचे नुकसान करणे, तसेच अधिकाऱ्यांवर हल्ला करणे, असे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. सरकारी वकिलांनी आरोप केला की, विमानात बसण्यापूर्वी गॅप्कोने १० गांजाच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. तसेच अशाच प्रकारच्या काही गोळ्या त्याने अन्य प्रवाशांनाही वाटण्याचा प्रयत्न केला होता.