वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

इस्रायलच्या सीरियामधील हल्ल्यांना अमेरिकेने विरोध केला आहे. ‘इस्रायलने नुकत्याच केलेल्या हल्ल्यांना अमेरिकेचा पाठिंबा नाही,’ असे वक्तव्य अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

ब्रूस म्हणाल्या, ‘इस्रायल आणि सीरियाशी आम्ही उच्च स्तरावर राजनैतिक संवाद ठेवून असून, सध्याच्या समस्येवर कायमस्वरुपी टिकेल, असा उपाय शोधला जात आहे.’ इस्रायलच्या भविष्यातील हल्ल्याला विरोध करणार का, यावर त्यांनी टिप्पणी केली नाही. अध्यक्ष ट्रम्प यांना पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित व्हावी, इस्रायल-सीरियासह सर्व शेजारी देशांमध्ये सौहार्दाचे संबंध असावेत, असे वाटते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इस्रायलने दमास्कस येथील संरक्षण मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळील परिसराला नुकतेच लक्ष्य केले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी यावर चिंता व्यक्त केली. या ठिकाणी होणाऱ्या हिंसेवर चिंता व्यक्त करणारे निवेदन त्यांनी प्रसिद्ध केले. सीरियामध्ये असाद यांना सत्तेवरून घालविल्यानंतर इस्रायल सातत्याने सीरियावर हल्ले करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चर्चवरील हल्ला ही चूक’

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा येथील चर्च इस्रायलच्या हल्ल्यात लक्ष्य झाल्यानंतर गुरुवारी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यान्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी या हल्ल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे समजते. नेतान्याहू यांनी ट्रम्प यांच्याशी बोलताना हा हल्ला चुकीने झाल्याचे मान्य केले. घटनेची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू आणि १० हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे.