Sanjeev Sanyal Post On US Civil War: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार तणाव निर्माण झाला आहे. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य असलेल्या संजीव सान्याल यांनी म्हटले आहे की, “सध्या अमेरिकेतील देशांतर्गत भावना ११ एप्रिल १८६१ रोजी, अमेरिकेतील दक्षिण आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धाच्या एक दिवस आधी जशा होत्या तशाच आहेत. गुलामगिरीच्या उच्चाटनावरून अमेरिकेतील राज्यांमध्ये गृहयुद्ध लढले गेले होते.”
चार्ली कर्क यांच्या हत्येनंतर काही तासांत पोस्ट
संजीव सन्याल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये हे विधान केले आहे. मात्र, त्यांच्या विधानासाठी कोणताही संदर्भ दिलेला नाही. पण, टर्निंग पॉइंट यूएसए या उजव्या विचारसरणीच्या वकिली संस्थेचे सह-संस्थापक असलेले चार्ली कर्क यांच्या हत्येच्या काही तासांनंतर त्यांनी ही पोस्ट केली आहे. देशातील वाढत्या नागरी हिंसाचाराच्या पद्धतीतील कर्क यांची हत्या ही ताजी घटना आहे. युटा व्हॅली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बंदुकीच्या हिंसाचारावरील प्रश्नांची उत्तरे देत असताना एका अज्ञात हल्लेखोराने कर्क यांची काल गोळ्या घालून हत्या केली होती.
ट्रम्प-कर्क संबंध
अमेरिकन तपास अधिकाऱ्यांना अद्याप कर्क यांच्या मारेकऱ्याची ओळख पटलेले नाही. यासह हत्येमागील हेतूही समोर आला नाही. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर कर्क यांच्या हत्येसाठी “कट्टरपंथी डाव्या” विचारसरणीला जबाबदार धरले आणि त्यांच्या निधनाचा शोक व्यक्त करण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये ध्वज अर्ध्यावर फडकवले जातील असे म्हटले होते.
राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प स्वतः एका राजकीय हत्येचे लक्ष्य बनले आहेत. त्यांच्या बाबतीत, गोळीबार करणारा व्यक्ती रिपब्लिकन पक्षाचा नोंदणीकृत सदस्य असल्याचे आढळून आले होते.
दरम्यान, कर्क हे ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आणि अमेरिकन अल्ट-राईटचे प्रमुख सदस्य म्हणून प्रसिद्ध होते. स्त्रीवादविरोधी, स्थलांतरविरोधी, गर्भपातविरोधी हक्क, एलजीबीटीक्यूविरोधी हक्क आणि वांशिक नागरी हक्कविरोधी कृती दृष्टिकोनांना प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता.
राजकीय हिंसाचाराच्या ३०० घटना
अमेरिकेत बंदुकींच्या मालकीच्या हक्कांबद्दल स्पष्टपणे बोलणारे कर्क हे बंदुकींच्या नियंत्रणाला विरोध करण्यासाठी प्रसिद्ध होते आणि जेव्हा त्यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा ते या विषयावरच बोलत होते.
अमेरिकेतील हाय-प्रोफाइल राजकीय हिंसाचाराची ही नवीन घटना काही वेगळी घटना नाही. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसरा, ६ जानेवारी २०२१ ते २०२४ च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीदरम्यान अमेरिकेत राजकीय हिंसाचाराच्या ३०० घटना घडल्या, ज्या सत्तरच्या दशकानंतर देशात सर्वाधिक आहेत.