Donald Trump Statue : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. आता पुन्हा एका वेगळ्या कारणांनी डोनाल्ड ट्रम्प चर्चेत आले आहेत. अमेरिकेच्या संसदेबाहेर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा १२ फूट उंच भव्य असा सोनेरी पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच या पुतळ्यामध्ये ट्रम्प यांच्या हातात बिटकॉइन दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पुतळ्याला पाहण्यासाठी अमेरिकन नागरिक गर्दी करत आहेत, तर दुसरीकडे या पुतळ्यावरून वादही सुरू झाला आहे. ट्रम्प यांच्या पुतळ्याचं अनावरण नेमकं अशावेळी झालं आहे की जेल्हा फेडरल रिझर्व्हने २५ टक्के व्याजदर कपातीची घोषणा केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

एका वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पुतळ्याला क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांनी निधी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर पुतळ्याच्या संदर्भातील काही पोस्ट शेअर करण्यात येत आहेत. यामध्ये क्रिप्टोकरन्सी समर्थकांनी ट्रम्प यांच्या या पुतळ्याबाबत कौतुक केलं आहे.

२०२४ नंतर पहिल्यांदाच व्याजदरात कपात

फेडरल रिझर्व्हने डिसेंबर २०२४ नंतर पहिल्यांदाच त्यांच्या प्रमुख व्याजदरात कपात जाहीर केली आहे. या कपातीमुळे अल्पकालीन व्याजदर ४.३ टक्क्यांवरून अंदाजे ४.१ टक्क्यांपर्यंत कमी होईल. बँकेने खुलासा केला आहे की ते या वर्षी व्याजदरात आणखी दोनदा कपात करण्याची योजना आखत आहेत. परंतु २०२६ मध्ये फक्त एकदाच कपात करण्याची योजना आहे. त्यामुळे वॉल स्ट्रीटमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे. यावरून डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या प्रमुखांमधील संबंधांबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कमी करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर ट्रम्प काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.