Donald Trump On Brics Extra Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्या न कोणत्या मुद्यांवरून कायम चर्चेत असतात. त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत घेतलेल्या काही निर्णयांचा जगातील अनेक देशांना फटका बसला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाची सध्या जगात चर्चा सुरु आहे. असं असतानाच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा १४ देशांवर नव्याने टॅरिफ लागू केलं आहे.
काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स राष्ट्रांवर १० टक्के अतिरिक्त कर लादणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी आता ब्रिक्स राष्ट्रांना पुन्हा एकदा धमकी देत १० टक्के अतिरिक्त कर लादणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच या संदर्भातील निर्णयाची लवकरात लवकर घोषणा करण्यात येणार असल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
व्हाइट हाउसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प ब्रिक्स राष्ट्रांबाबत बोलताना म्हणाले की, “ब्रिक्समध्ये सहभागी असलेल्या देशांना आता लवकरच १० टक्के अतिरिक्त कर द्यावा लागेल. कारण ब्रिक्सची स्थापना अमेरिकेला नुकसान पोहोचण्याच्या हेतूनेच करण्यात आली होती”, असं ट्रम्प यांनी म्हटलं. दरम्यान, ब्रिक्स राष्ट्रात भारत देखील सहभागी देश आहे, त्यामुळे अमेरिकेच्या या धोरणाचा भारतालाही फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#WATCH | On India, in respect of tariffs, US President Donald Trump says, "…They will certainly have to pay 10% if they are in BRICS because BRICS was set up to hurt us, to degenerate our dollar…The Dollar is king. We are going to keep it that way. If people want to challenge… pic.twitter.com/VgVF2olMPL
— ANI (@ANI) July 8, 2025
ब्रिक्स म्हणजे काय?
ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश एकत्र येऊन ‘ब्रिक’ नावाचे एक संघटन तयार करण्यात आले. २००१ मध्ये गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक जिम ओ’नील यांनी ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचे वर्णन करण्यासाठी ब्रिक हा शब्द वापरला. या शब्दाचा स्वीकार करून पहिली ब्रिक शिखर परिषद १६ जून २००९ रोजी रशियातील येकातेरिनबर्ग येथे झाली. सर्वात वेगाने वाढणाऱ्या विकसनशील देशांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पाश्चात्य शक्तींचे वर्चस्व असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा सामना करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती. २०१० मध्ये या संघटनेत दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर संघटनेला ब्रिक्स असे नाव देण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी १४ देशांवर लादले आयातशुल्क
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:च कर लागू करण्यासंदर्भात विविध देशांना पत्रे पाठवले जातील असं सांगितलं होतं. त्यानंतर नुकतंच १४ देशांना नव्या टॅरिफ दरांसंदर्भात पत्र पाठवत आयातशुल्क लादण्यात आले आहेत. यामध्ये दक्षिण कोरिया आणि जपानचाही सहभाग आहे.
वाचा कोणत्या देशांवर किती टॅरिफ आकारले?
१. म्यानमार – ४० टक्के
२. लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक – ४० टक्के
३. कम्बोडिया – ३६ टक्के
४. थायलंड – ३६ टक्के
५. बांगलादेश – ३५ टक्के
६. रिपब्लिक ऑफ सर्बिया – ३५ टक्के
७. इंडोनेशिया – ३२ टक्के
८. दक्षिण आफ्रिका – ३० टक्के
९. बोस्निया अँड हर्झेगोविना – ३० टक्के
१०. जपान – २५ टक्के
११. दक्षिण कोरिया – २५ टक्के
१२. मलेशिया – २५ टक्के
१३. कझाकिस्तान – २५ टक्के
१४. रिपब्लिक ऑफ ट्युनिशिया – २५ टक्के