अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा महाभियोगाची कारवाई होणारे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या इतिहासातील पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. एकीकडे कारवाई सुरु असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून कॅपिटॉल हिल येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. यावेळी त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं असून पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती टाळा असंही म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हिंसाचार मी विश्वास ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीविरोधात तसंच आपल्या चळवळीविरोधात आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, “माझा खरा समर्थक असा राजकीय हिंसाचार करणार नाही. माझा कोणताही समर्थक अशा पद्धतीने कायद्याचा आणि आपल्या ध्वजाचा अपमान करणार नाही. आपल्या नागरिकांना अशा पद्धतीनं धमकावणार नाही. यापैकी तुम्ही काहीही केलं असेल तर तुम्ही चळवळीला पाठिंबा देत नाही आहात. तुम्ही त्यावर हल्ला करत आहात. तुम्ही आपल्या देशावर हल्ला करत आहात आणि हे सहन केलं जाणार नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी यावेळी कॅपिटॉल हिंसाचारात सहभागी झालेल्यांना शिक्षा होईल असं आश्वासन दिलं आहे. “कोणतीही माफी, अपवाद नाही. अमेरिकेत कायद्याचं राज्य असून हिंसाचारात सहभागी झालेल्यांना योग्य शिक्षा केली जाईल,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

विशेष म्हणजे या व्हिडीओत ट्रम्प यांनी महाभियोग कारवाईचा उल्लेखही केला नाही. मात्र यावेळी त्यांनी काही सोशल मीडिया कंपन्यांनी टाकलेल्या बंदीचा उल्लेख केला. हा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. “आपल्या काही लोकांना सेन्सॉर किंवा ब्लॅकलिस्ट करण्याचे प्रयत्न चुकीचे आणि घातक आहेत. सध्या आपण एकमेकांचं ऐकून घेण्याची गरज आहे, एकमेकांना शांत करण्याची नाही,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाबाबत रिपब्लिकन पक्षात मतभेद

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पक्षामध्ये मतभेद झाले. दरम्यान, प्रतिनिधीगृहाने २५ व्या घटना दुरुस्तीनुसार उपाध्यक्षांनी हकालपट्टीची कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे. प्रतिनिधिगृहाने महाभियोगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना पंचविसाव्या घटना दुरुस्तीनुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती करण्यास सांगितले आहे. याबाबतचा ठराव २२३ विरुद्ध २०५ मतांनी मंजूर झाला असून पक्षीय पातळीवर हे मतदान झाले.

प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व असून एका रिपब्लिकन प्रतिनिधीने ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर इतर पाच जण तटस्थ राहिले. याबाबतच्या ठरावात असे म्हटले आहे, की उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी २५ व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ट्रम्प यांना अधिकारपदावरून दूर करावे.

यातील २५ वी घटना दुरुस्ती ही पन्नास वर्षांपूर्वी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या खुनानंतर मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार अध्यक्ष जर काम करण्यास सक्षम नसतील तर त्यांच्या जागी उपाध्यक्ष देशाचा कारभार करू शकतात अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार उपाध्यक्ष पेन्स हे मावळते अध्यक्ष ट्रम्प यांना अक्षम ठरवून पदावरून काढून टाकू शकतात. त्यासाठी त्यांना मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

पेन्स यांनी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पलोसी यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले होते, की २५ वी घटना दुरुस्ती लागू करून ट्रम्प यांना आपण काढून टाकणार नाही. राज्यघटनेतील २५ वी दुरुस्ती ही अध्यक्षांना शिक्षा करण्याच्या उद्देशाने केलेली नाही, त्यामुळे ट्रम्प यांना काढून टाकण्यासाठी या तरतुदीचा वापर केल्यास चुकीचा पायंडा पडू शकतो. पलोसी यांनी सभागृहात ६ जानेवारीला असे सांगितले होते, की ट्रम्प यांनी अमेरिकेतील कॅपिटॉल हिल या संसदेच्या इमारतीत हिंसाचाराला उत्तेजन दिले होते. त्यामुळे अमेरिकी लोकशाहीला काळिमा फासला गेला आहे. जो बायडेन व कमला हॅरिस यांच्या निवडीवर प्रतिनिधीवृंदाचे शिक्कामोर्तब होत असताना ट्रम्प यांनी हा हिंसाचार घडवून आणला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us president donald trump condemns capitol violence rioters will be brought to justice sgy
First published on: 14-01-2021 at 07:42 IST