Donald Trump On Illegal Immigration In Europe: स्कॉटलंड दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, स्थलांतराच्या बाबतीत युरोपला ‘एकत्रितपणे काम करावे लागेल’ आणि जर हे आक्रमण रोखले नाही, तर युरोप खंड यापुढे अस्तित्वात राहणार नाही. स्कॉटलंडच्या प्रेस्टविक विमानतळावर उतरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, युरोपातील नेत्यांना आणि लोकांना काही गोष्टी सांगायच्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अवैध स्थलांतर आहे.
“अवैध स्थलांतराबद्दल मी काही गोष्टी सांगू शकतो, पण यासाठी तुम्हालाच एकत्र पाऊल उचलावं लागेल, अन्यथा युरोप तुमच्याकडे राहणार नाही”, असे ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, स्कॉटलंड दौऱ्यावर आलेले डोनाल्ड ट्रम्प आज (शनिवारी) ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांची भेट घेणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे असा दावा केला की, गेल्या महिन्यात एकाही अवैध स्थलांतरिताने अमेरिकेत प्रवेश केला नाही. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची त्यांनी अवैध स्थलांतरितांना देशात प्रवेश दिल्याबद्दल खिल्ली उडवली.
स्थलांतर युरोपचा नाश करत आहे
“तुम्हाला माहिती आहे का, गेल्या महिन्यात आमच्या देशात एकाही अवैध स्थलांतरिताने प्रवेश केला नाही. आम्ही ते बंद केले. बायडेन यांच्या काळात आलेल्या अनेक वाईट लोकांना आम्ही देशातून बाहेर काढले. जेव्हा हे घडत होते, तेव्हा बायडेन निष्क्रिय होते. तुम्हीही तुमच्या देशांमध्ये अवैध स्थलांतरितांना येऊ देता. पण तुम्हाला हे भयानक आक्रमण थांबवावे लागेल. हे स्थलांतर युरोपचा नाश करत आहे”, असे ट्रम्प पुढे म्हणाले.
देश अनोळखी लोकांचे बेट
गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारात डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतराचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. युरोपमध्येही हा एक प्रमुख मुद्दा आहे. मे महिन्यात ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी एका भाषणात अवैध स्थलांतराच्या नियंत्रणाच्या कठोर योजना जाहीर केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी देश “अनोळखी लोकांचे बेट” बनण्याचा धोका असल्याचे म्हटले होते.
इटलीची कठोर भूमिका
इटलीनेही स्थलांतरावर कठोर भूमिका स्वीकारली आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यापूर्वी म्हटले आहे की, त्या देशाला “युरोपची निर्वासित छावणी” बनू देणार नाहीत.