Donald Trump On India Pakistan Tension : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी दहशतवादी तळांना लक्ष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र, त्यानंतर पाकिस्तानची आगळीक सुरु असून पाकिस्तान भारताच्या दिशेने ड्रोन हल्ले करत आहे. तसेच भारत देखील पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव वाढल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेची प्रतिक्रिया समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमधील तणाव शक्य तितक्या लवकर कमी करण्याचं आवाहन दोन्ही देशांना केलं आहे. तसेच यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो हे भारत आणि पाकिस्तानच्या संपर्कात असल्याची माहिती अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.

अमेरिकेने काय प्रतिक्रिया दिली?

भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितलं की, “परराष्ट्र सचिव आणि आता आमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो हे दोन्ही देशांच्या संपर्कात आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मत व्यक्त केलं आहे की भारत-पाकिस्तानमधील तणाव लवकरात लवकर कमी व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. तसेच त्यांनी म्हटलं आहे की, हे दोन्ही देशांचे गेल्या काही शकांपासून एकमेकांशी मतभेद आहेत. तसेच त्यांचे दोन्ही देशांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. परराष्ट्र सचिव मार्को रुबियो हे दोन्ही देशांच्या नेत्यांशी सतत संपर्कात आहेत आणि हा संघर्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं व्हाईट हाऊसच्या कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केलं.

अमेरिका दोन्ही देशांच्या संपर्कात

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मार्को रुबियो यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी काही दिवसांपूर्वीच या विषयावर चर्चा केली होती. तसेच ते दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याचं मार्को यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा अमेरिकेकडून भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया समोर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर मोठी कारवाई केल्यानंतर सध्या दोन्ही देशांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच भारतात देखील देशभर ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानच्या संभाव्य कुरापतींविरोधात रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती सांगितली जात आहे.