Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या जवळपास तीन वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे, यामध्ये युक्रेनच्या अनेक शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर रशिया आणि युक्रेन संघर्षाचा फटका जगभरातील देशांनाही सहन करावा लागत आहे. मात्र, रशिया-युक्रेन संघर्ष थांबावा यासाठी काही दिवसांपूर्वी अमेरिकेने मध्यस्थी केली होती. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न देखील केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन संघर्ष थांबण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर फोनवरून चर्चा देखील केली होती. त्यानंतर रशियानेही होकार दर्शवला होता. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी सफल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, असं असतानाच आता रशिया-युक्रेन संघर्षाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतरही रशिया-युक्रेन शांतता करार होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत, त्यामुळे आता अमेरिका हा शांतता करार करण्याचा प्रयत्न सोडून देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीन दिलं आहे.
दरम्यान, “रशिया-युक्रेन शांतता करार होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत नसल्यामुळे पुढील काही दिवसांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सोडून देतील”, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी शुक्रवारी बोलताना सांगितलं आहे. मार्को रुबियो यांनी म्हटलं की, “आम्ही हे प्रयत्न अनेक आठवडे आणि महिने सुरू ठेवणार नाही. त्यामुळे आता लवकर ठरवावं लागेल आणि पुढील काही आठवड्यात हे शक्य आहे की नाही? हे पाहावं लागेल”, असं युरोपियन आणि युक्रेनियन नेत्यांना भेटल्यानंतर मार्को रुबियो यांनी स्पष्ट केलं आहे.
वृत्तानुसार, ट्रम्प यांना याबद्दल खूप ठामपणे वाटतं. त्यांनी यासाठी बराच वेळ आणि शक्ती समर्पित केली. परंतु इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी चालू आहेत, ज्यांवर जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचं स्पष्ट करत मार्को रुबियो यांनी एक सूचक इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या युद्धबंदी प्रस्तावावर रशियाने ठेवली होती ‘ही’ अट
युक्रेनने या योजनेशी आपली वचनबद्धता दर्शविल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची प्रतिक्रिया समोर आली होती. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, “रशिया लढाई थांबवण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाशी सहमत आहोत. पण कोणत्याही युद्धबंदीमुळे कायमस्वरूपी शांतता निर्माण झाली पाहिजे आणि संघर्षाची मूळ कारणे दूर झाली पाहिजेत. शत्रुत्व थांबवण्यासाठी युद्धबंदीच्या प्रस्तावाशी आम्ही सहमत आहोत. पण युद्धबंदीमुळे शांतता निर्माण झाली पाहिजे. तसेच या संकटाची मूळ कारणे दूर झाली पाहिजेत, या वस्तुस्थितीवरून आम्ही पुढे जात आहोत”, असं पुतिन यांनी म्हटलं आहे.
तसेच व्यावहारिक दृष्टीने युद्धबंदीचा अर्थ काय असेल? यावरही पुतिन यांनी प्रश्न उपस्थित केले होते. ज्यामुळे रशियन हद्दीत युक्रेनियन घुसखोरी आणि २००० किलोमीटरच्या रेषेवरील व्यापक परिणामांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. याबाबत व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं होतं की, “याचा अर्थ असा होईल का की तिथले सगळे लोक निघून जातील, त्यांनी तेथील नागरिकांविरुद्ध असंख्य गुन्हे केल्यानंतर आपण त्यांना सोडावे का? की युक्रेनियन नेतृत्व त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगेल?”. पुतिन यांनी म्हटलं की, “कोणत्याही युद्धबंदीमध्ये युक्रेनच्या अधिक सैन्य तैनात करण्याच्या किंवा शस्त्रास्त्रे आयात करण्याच्या क्षमतेवर निर्बंध असले पाहिजेत.”