Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून अद्यापही सुरु आहे. रशिया युक्रेनवर हल्ले करत असून या हल्ल्याचे युक्रेनवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. रशिया-युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी देखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मध्यस्थीला अद्याप यश आलेलं नाही. यातच कैद्यांच्या अदलाबदली दरम्यान रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला केला.
या हवाई हल्ल्यात युक्रेनच्या १३ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. रशियाने युक्रेनियन शहरांवर तब्बल ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती सांगितली जाते. रशियाने युक्रेनवर हवाई हल्ला केल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या विरोधात कडक निर्बंध लादण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली असून ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं आहे.
ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतिन आणि वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या दोघांवरही जोरदार टीका केली आहे. तसेच तसेच व्लादिमीर पुतिन हे वेडे झाले असून विनाकारण लोकांना मारत असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या संदर्भात ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ट्रम्प म्हणाले की, “रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी माझे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. मात्र, त्यांच्याबरोबर काहीतरी घडलं आहे. कारण ते पूर्णपणे वेडे झाले आहेत. युक्रेनियन शहरांवर विनाकारण क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले जात आहेत”, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
‘पुतिन यांना संपूर्ण युक्रेन हवंय’
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, “मी नेहमीच म्हटलं आहे की त्यांना संपूर्ण युक्रेन हवं आहे. फक्त त्याचा एक भाग नाही. आता कदाचित ते तसं होत असल्याचंही सिद्ध होत आहे. मात्र, जर रशियाने तसं केलं तर ते रशियाच्या पतनास कारणीभूत ठरेल”, असा इशाराही ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतिन यांना दिला आहे.
ट्रम्प यांची झेलेन्स्की यांच्यावरही टीका
डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, “त्याच्या (झेलेन्स्की) तोंडून निघणारी प्रत्येक गोष्ट समस्या निर्माण करते. मला ते आवडत नाही आणि ते थांबलं पाहिजे. झेलेन्स्की ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने ते आपल्या देशाचं काहीही भलं करत नाहीत”, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.