अफगाणिस्तानमधील आयसिसच्या तळावर अमेरिकेने गुरुवारी बॉम्बहल्ला केला असून अमेरिकी सैन्याच्या या कारवाईचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कौतुक केले आहे. आम्हाला सैन्याचा अभिमान असून आणखी एक मोहीम यशस्वी झाली असे सांगत ट्रम्प यांनी सैन्याचे कौतुक केले आहे.
अफगाणिस्तानमधील अचिन या जिल्ह्यात नानगरहर या प्रांतात आयसिसचे तळ असून या दहशतवादी संघटनेचे अनेक नेते या भागात लपून बसल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागली होती. आयसिसचे अड्डे उद्धवस्त करण्यासाठी अमेरिकेने गुरुवारी जीबीयू- ४३/बी एमओबी या बॉम्बचा वापर केला होता. एमओबी म्हणजेच मदर ऑफ बॉम्ब हा अमेरिकेकडील सर्वात मोठा बिगर आण्विक बॉम्ब आहे. या बॉम्बचे वजन २१ हजार ६०० टन आहे. या हल्ल्यात जीवितहानी किती झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आयसिसच्या तळावरील बॉम्ब हल्ल्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला सैन्याचा अभिमान आहे. सैन्याला यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले होते. अमेरिकी सैन्याची आणखी एक यशस्वी मोहीम असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकी संसदेतील खासदारांनीही ट्रम्प प्रशासनाचे कौतुक केले.
आयसिसच्या तळावरील हल्ल्याने ट्रम्प प्रशासनाने आयसिसला योग्य संदेश दिला असे अमेरिकेतील खासदारांनी म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने आयसिससोबतच रशिया, उत्तर कोरिया, इराण आणि जगभरातील देशांना कठोर संदेश दिला आहे असे केव्हीन यांनी म्हटले आहे. तर डेमोक्रेटीक पक्षाच्या खासदारांनी ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये १६ वर्षांपासून सुरु असलेल्या युद्धाला पुन्हा नव्याने सुरुवात होईल अशी भीती खासदारांनी वर्तवली आहे.