US President Donald Trump on India Pakistan War : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा करत आहेत. हा संघर्ष मीच रोखला असं त्यांचं म्हणणं आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत २० हून अधिक वेळा हा दावा केला आहे आणि उभय देशांमधील संघर्ष थांबवल्याचं श्रेय घेऊ पाहात आहेत. आता ते म्हणाले आहेत की “भारत व पाकिस्तान यांच्यामधील युद्धात पाच लढाऊ विमानं पाडण्यात आली. हे युद्ध एवढं पेटलं होतं की ते अणुयुद्धात रुंपातरित होण्याच्या मार्गावर होतं.” ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचा दावा केला असला तरी भारताने प्रत्येक वेळी त्यांच्या दाव्यांचं खंडण केलं आहे.
रिपब्लिकन सिनेटर्ससाठी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले, “आम्ही भारत व पाकिस्तान, कॉन्गो (कॉन्गोचे लोकशाही प्रजासत्ताक) आणि रवांडा यांच्यातील युद्ध थांबवली. ही खूप गंभीर युद्ध होती. भारत पाकिस्तानमध्ये घमासान चालू होतं. त्यांनी पाच लढाऊ विमानं पाडलं होती. स्थिती गंभीर होताच मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की तुम्ही हे युद्ध असंच चालू ठेवलं तर आता आपल्यात व्यापार होणार नाही. तुमच्या अशा वागण्याने तुमच्या देशाचं भलं होणार नाही. दोन्ही खूप शक्तीशाली राष्ट्रे आहेत. दोघांकडे अणुबॉम्ब आहेत. अणू युद्ध झालं असतं तर जगाला मोठा फटका बसला असता. मात्र, मी ते युद्ध थांबवलं.
आम्ही भारत व पाकिस्तानमधील एक मोठा संघर्ष थांबवला : ट्रम्प
काही दिवसांपूर्वी एअर फोर्स वनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, “तुम्हाला माहितीय मी काय केलं? बाकीचे लोक विचारही करत नाहीत असं काहीतरी मी केलं आहे. परंतु, मी त्याबद्दल फार बोलत नाही, श्रेय घेत नाही. परंतु, आम्ही भारत व पाकिस्तानमधील एक मोठा संघर्ष थांबवला, संभाव्य अणू युद्ध रोखलं. मी पाकिस्तानशी बोललो, मी भारताशीही बोललो. या दोन्ही देशांचे नेते खूप चांगले आहे. ते शक्तीशाली आहेत. मात्र, ते आपसांत लढत होते. या देशांमध्ये अणू युद्ध झालं असतं. मात्र, मी दोन्ही देशांना इशारा दिला की तुमच्यातील युद्ध असंच चालू राहिलं तर आम्ही तुमच्याबरोबरचा व्यापार थांबवू. त्यानंतर त्यांनी युद्ध थांबवलं. दोन्ही देशांचे प्रमुख नेते हुशार आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतला”.