US President Donald Trump Warns China : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क जाहीर केलं आहे. त्यापैकी २५ टक्के आयात शुल्काची अंमलबजावणी चालू आहे. उर्वरित २५ टक्के आयात शुल्क आकारण्यास सुरुवात होणार आहे. आयात शुल्कावरून अमेरिकेचा चीनबरोबर देखील संघर्ष चालू आहे. अशातच ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, “माझ्याकडे काही हुकुमाचे पत्ते आहेत, परंतु मला ते बाहेर काढायचे नाहीत.” त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचे शब्द सावरले आणि म्हणाले की “चीन व अमेरिकेची चांगली मैत्री आहे. ही मैत्री पुढे जात आहे.” दरम्यान, भारत व चीनची वाढत असलेली जवळीक ट्रम्प यांना खटकत असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी संध्याकाळी (२५ ऑगस्ट) वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “चीनबरोबर आपले खूप चांगले संबंध असतील. त्यांच्याकडे काही चांगले पत्ते आहेत. परंतु, आपल्याकडे हुकुमाचे पत्ते आहेत. मात्र मी ते पत्ते खेळणार नाही. मी ते पत्ते बाहेर काढले तर चीन उद्ध्वस्त होईल. त्यामुळे मी ते पत्ते खेळणार नाही.”
ट्रम्प यांचं भारत व चीनविरोधात टॅरिफ अस्त्र
डोनाल्ड ट्र्म्प यांनी आधी चीन आणि आता भारताविरोधात टॅरिफ अस्त्र उगारलं आहे. यामुळे दोन्ही देशांच्या भांडवली बाजारांमध्ये काही दिवस उलथापालथ झाली खरी मात्र, दोन्ही देशांचे भांडवली बाजारात आता स्थिर आहेत. अशातच, भारत व चीनमधील जवळीक वाढू लागली आहे. चीनने भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. भारतानेही त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे.
भारत व चीनची वाढती जवळीक डोनाल्ड ट्रम्प यांना खुपतेय?
जग व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावर असताना चीन भारताची मदत करण्यास तयार आहे. चीनने नुकतंच भारताला रेअर अर्थ मटेरियल्स (दुर्मिळ मूलद्रव्ये) आणि बोगदा खोदणारी यंत्रसामग्री देण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र, भारत व चीनची वाढती जवळीक डोनाल्ड ट्रम्प यांना खुपत असल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रम्प चीनला २०० टक्के आयात शुल्क लादण्याची धमकी देऊ शकतात, असं आंतरराष्ट्रीय व्यापार विश्लेषकांना वाटतं. मात्र, ट्रम्प यांनी असं वक्तव्य केलेलं नाही.
चीनच्या तेलखरेदीवर अमेरिकेचा आक्षेप नाही
भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याला ट्रम्प यांचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादलं आहे. मात्र, रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या, रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या चीनबाबत अमेरिकेा काहीशी मवाळ धोरण अवलंबत असल्याचं दिसत आहे. चीन हा रशियन तेलाचा सर्वात मोठा ग्राहक असूनही अमेरिकेने त्यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही.