टोकियो : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मंगळवारी जपानमध्ये स्वागत करण्यात आले. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान सनाई तकाइची यांचे ट्रम्प यांनी अभिनंदन केले. तकाइची यांच्यासह ट्रम्प यांनी विमानवाहू नौकेवर अमेरिकी सैनिकांशी संवाद साधला. ‘‘अमेरिका कधीही जपानची मान खाली जाऊ देणार नाही. जपान अमेरिकेचा अतिशय घट्ट मित्रदेश आहे,’’ असे ट्रम्प म्हणाले. विविध ऊर्जा आणि तंत्रज्ञान प्रकल्पांचे त्यांनी या वेळी अनावरण केले.

तकाइची यांनी अमेरिकेबरोबर आर्थिक गुंतवणूक अधिक होण्यासाठी चर्चा केली. जपानबरोबर ५५० अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट या वेळी ठेवण्यात आले. या वेळी ट्रम्प म्हणाले, ‘‘तुम्ही खूप चांगले व्यापारी लोक आहात. तुमच्या देशाची मान अमेरिका कधीही खाली पडू देणार नाही. जपानसाठी मला काहीही करणे शक्य असेल, तर आम्ही तिथे आहोत.

अतिशय मजबूत अशी आपली युती आहे.’’ तत्पूर्वी तकाइची यांनी ट्रम्प यांचे हस्तांदोलन करून स्वागत केले. पुढील वर्षी अमेरिकेच्या स्थापनेला २५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त जपानमधून २५० चेरी वृक्ष पाठविण्यात येतील, असे तकाइची यांनी सांगितले. जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्या काळातील राजनैतिक संबंधांचाही त्यांनी उल्लेख केला. टोकियोमध्ये व्यापारी प्रतिनिधींबरोबर भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. वाणिज्यमंत्री होवार्ड लुटनिक यांनी ४९० अब्ज डॉलरची गुंतवणुकीची घोषणा केली. त्यातील प्रत्येकी १०० अब्ज डॉलर आण्विक प्रकल्पांसाठी आहेत.