इस्रायलने हमास गाझातील रुग्णालयांचा वापर हल्ल्यांचा समन्वय करण्यासाठी करत असल्याचा आरोप करत अशा स्थितीत रुग्णालयांना हल्ल्यापासून संरक्षण दिलं जाणार नाही, असा इशारा दिला. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गाझातील रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली आहे. याबाबत सीएनएनने वृत्त दिलं आहे.

इस्रायलच्या सैन्याने दोन आठवड्यांपूर्वी सूचक विधान केलं. यात त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गाझातील रुग्णालयांचा दहशतवादी कृत्यांसाठी वापर झाल्यास या रुग्णालयांना मिळालेलं हल्ल्यांपासूनच संरक्षण जाऊ शकतं, असं म्हटलं. यातून इस्रायलने गाझातील रुग्णालयंही त्यांच्या निशाण्यावर असल्याचं सूचित केलं आहे. इस्रायलने गाझातील अल-शिफा रुग्णालयाच्या खाली हमासची कार्यालयं असल्याचा आरोप केला होता.

“रुग्णालयांचं संरक्षण झालं पाहिजे”

जो बायडेन म्हणाले, “इस्रायल-हमास युद्धात जे सुरू आहे त्याबाबत काळजी व्यक्त करण्यात मी कधीही संकोच केलेला नाही. युद्धात रुग्णालयांवर हल्ले होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी मला आशा आहे. आम्ही इस्रायलशीही संपर्कात आहोत. बंदी बनवण्यात आलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठीही चर्चा सुरू आहे. कतारही यात सहभाग घेत आहे. त्यामुळे मला याबाबत आशा आहे. असं असलं, तरी रुग्णालयांचं संरक्षण झालं पाहिजे.”

“…तर ७०० रुग्णांचा मृत्यू होईल”

इस्रायलच्या हल्ल्यानंतर अल शिफा आणि अल कुड्स या गाझातील रुग्णालयांमध्ये इंधन आणि वीजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रुग्णालयांची स्थिती बिघडत आहे. सीएनएनने पॅलेस्टाईनच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही रुग्णालयांचं काम ठप्प झालं आहे.अल शिफातील डॉक्टर इस्रायच्या सक्तीने रुग्णालय रिकामं करण्याच्या आदेशाला विरोध करत आहेत. असं केल्यास ७०० रुग्णांचा मृत्यू होईल, अशी काळजी त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “इस्रायली लष्कराकडून पॅलेस्टिनींवर बलात्कार झाले नव्हते का?” इतिहासाच्या शिक्षकाचे वादग्रस्त वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ७ ऑक्टोबरला सुरू झालेल्या युद्धानंतर आतापर्यंत ११ हजार १८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात ४ हजार ६०९ लहान मुलांचा आणि ३ हजार १०० स्त्रियांचा समावेश आहे. याबाबत पॅलेस्टिनच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.