भारत व पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून असलेले मतभेद दूर करण्याकरिता खास दूत नेमण्याची कल्पना अमेरिकेने फेटाळून लावली आहे. दोन्ही देशांतील अमेरिकी राजदूतांनी यजमान सरकारांशी संपर्क साधून त्यांना संवाद सुरू करण्यास सांगितले असून अमेरिकेच्या काश्मीरविषयक धोरणात कुठलाही बदल झाला नसल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये अनेकदा प्रत्यक्ष ताबा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून त्यावर अमेरिकेने ही प्रक्रिया व्यक्त केली आहे.
मध्य पूर्व शांतता प्रक्रियेसाठी ज्याप्रमाणे खास दूताची नेमणूक करण्यात आली त्याच धर्तीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील काश्मीर प्रश्नावरही खास दूत नेमण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्तया मारी हार्फ यांनी सांगितले, की काश्मीर व इतर प्रश्नांवर या दोन्ही देशांना संवाद सुरू करण्यास उत्तेजन दिले जाऊ शकते, पण त्यासाठी खास दूत वगैरे नेमण्याची गरज आम्हाला वाटत नाही. या संदर्भात आमच्या देशाचे राजदूत संबंधित देशांच्या सरकारांशी चर्चा करीत आहेत.
आमचे राजदूत नेमके कशा प्रकारे या देशांच्या सरकारांशी संपर्कात आहेत याबाबत कुठलाही अंदाज आपण व्यक्त करणार नाही, दोन्ही देशांना संवादाची प्रक्रिया पुढे नेण्यास उत्तेजन दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तान दरम्यान प्रत्यक्ष ताबा रेषेवर जो हिंसाचार झाला त्याबाबत अमेरिकेला चिंता वाटते, पण या दोन्ही देशांची सरकारे त्यानंतरही एकमेकांच्या सपंर्कात आहेत असे आम्हाला वाटते. ते यापुढेही द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी संवाद कायम ठेवतील, अशी अपेक्षा हार्फ यांनी व्यक्त केली.