करोना व्हायरसचा फैलाव रोखणारी लस विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटितपणे जे प्रयत्न सुरु आहेत, त्यात सहभागी होणार नाही असे ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले. लस विकसित करण्यासाठी आणि वितरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करणार नाही अशी ट्रम्प प्रशासनाची भूमिका आहे. अशा प्रकल्पात काम करताना जागतिक आरोग्य संघटनांसारख्या संस्थांमुळे काही गोष्टी कराव्याच लागतील. इच्छेविरुद्ध अशा गोष्टी करणे मान्य नसल्यामुळे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करण्यास नकार दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेने स्वबळावर लस विकसित करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त सर्वप्रथम वॉशिंग्टन पोस्टने दिले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानुसार, ‘जागतिक आरोग्य संघटना चीनच्या प्रभावाखाली असून WHOमध्ये मोठया प्रमाणावर सुधारणांची आवश्यकता आहे’. करोनावरील लस विकसित करण्याच्या प्रकल्पात १५० पेक्षा जास्त देश सहभागी असून हा गट WHO शी जोडलेला आहे. असोसिएटेड प्रेसने हे वृत्त दिले आहे.

WHO नुसार, विविध देशांची सरकारे लस उत्पादक कंपन्यांसोबत व्यक्तीगत पातळीवर करार करत आहेत. त्यांना सुद्धा ‘कोव्हॅक्स’मध्ये सहभागी होण्याचा फायदा होईल. लस उत्पादक कंपनीसोबत एखाद्या देशाचा करार यशस्वी होऊ शकला नाही, तरी ‘कोव्हॅक्स’च्या माध्यमातून त्या देशाला ती लस मिळू शकते.

अमेरिकेत AstraZeneca ची लस तिसऱ्या टप्प्यात
करोना संकट अद्यापही टळलं नसताना सध्या सर्वांचं लक्ष करोनाचं लस कधी उपलब्ध होईल याकडे लागलं आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी AstraZeneca ची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून चाचणी पूर्ण होण्याच्या अगदी जवळ पोहोचली असल्याचं सांगितलं आहे. AstraZeneca ची लस करोनाविरोधात वापरण्यासाठी परवानगी मिळेल असा विश्वासही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“मला तुम्हा सर्वांना सांगताना आनंद होत आहे की, AstraZeneca ची लस तिसऱ्या वैद्यकीय चाचणीत पोहोचली आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी बोलताना सांगितलं. करोना लस तयार करणाऱ्यांमध्ये AstraZeneca आघाडीवर आहे. यासोबतच Moderna आणि Pfizer यांची लसही तिसऱ्या टप्प्यात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us says it wont join global effort to find covid 19 vaccine dmp
First published on: 02-09-2020 at 08:30 IST