वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
भारताने रशियाकडून केलेली शस्त्रखरेदी आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘ब्रिक्स’ देशांबरोबर केलेल्या प्रयत्नांचा फटका अमेरिकेला बसला. त्यामुळे दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांमध्ये तणाव होता. मात्र आता भारताने अमेरिकेला वाटणाऱ्या या चिंतांचे निराकरण केले असून, दोन्ही देशांत लवकरच व्यापार करार होईल, असा दावा अमेरिकेचे वाणिज्यमंत्री होवार्ड लुटनिक यांनी मंगळवारी केला.

‘‘उत्पादन क्षेत्रात अमेरिकेला पुन्हा चांगले दिवस आणायचे असून व्यापारी तूट कमी करण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे,’’ या भूमिकेचा लुटनिक यांनी पुनरुच्चार केला. आठव्या ‘भारत-अमेरिका सामरिक भागीदारी फोरम लीडरशिप समिट’मध्ये बोलताना ते म्हणाले, की भारताने यापूर्वी अशा काही गोष्टी केल्या आहेत, की ज्याचा अमेरिकेला फटका बसला. उदाहरण द्यायचे झाले, तर भारत शस्त्रे साधारण रशियाकडून खरेदी करतो. मात्र आता भारताने अमेरिकेकडून शस्त्रखरेदीस सुरुवात केली आहे. याखेरीज, डॉलरचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी ‘ब्रिक्स’ देशांशी सहकार्य केले गेले. अशा रितीने अमेरिका तुमचा मित्र देश होऊ शकत नाही. अमेरिकेच्या अध्यक्षांनी या बाबी भारतासमोर थेट मांडल्या आणि भारतही त्याला थेट आणि विशेष असा प्रतिसाद देत आहे. दोन्ही देश सकारात्मक पातळीवर पोहोचले आहेत, असे लुटनिक म्हणाले.

भारताबरोबर जुलै महिन्यात व्यापारी करार होण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली. भारत आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक करताना लुटनिक म्हणाले, की भारतीयांमध्ये उत्साह आणि ध्येयवाद असल्यामुळे अर्थव्यवस्था सातत्याने प्रगती करील. डोनाल्ड ट्रम्प यांना भारताबद्दल अतीव आदर आहे आणि दोन्ही देशांमध्ये खूप चांगले संबंध येत्या काळात असतील. इतर देशांत ज्या गोष्टी करणे शक्य होत नाही, त्या भारतात करणे शक्य होते. ट्रम्प ‘अमेरिका फर्स्ट’ म्हणत असले, तरी ‘फक्त अमेरिका’ आणि ‘केवळ आणि केवळ अमेरिका’ असे ते म्हणत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताबरोबरचे संबंध वैयक्तिक उषा व्हान्स

भारत-अमेरिका संबंध आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवरील असून, द्विस्तरावरील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ही मोठी संधी असल्याचे मत अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या ‘सेकंड लेडी’ उषा व्हान्स यांनी व्यक्त केले. आपले कुटुंबीय भारतात आहेत, त्यांना भेटत राहूनच आपण मोठ्या झालो आहोत, असे त्या म्हणाल्या.