एपी, कौलालंपूर
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांची मलेशिया येथे शुक्रवारी भेट घेतली. चीनचा रशियाला युक्रेन युद्धात पाठिंबा, व्यापाराचे मुद्दे आदींवरून दोन्ही देशांचे संबंध ताणले असताना ही भेट झाली. या भेटीबरोबरच रुबिओ यांच्या पहिलावहिल्या आशिया दौऱ्याचीही सांगता झाली. आग्नेय आशियायी देशांच्या सुरक्षा परिषदेनिमित्त ते मलेशिया येथे आले होते.
दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर कुणीही पत्रकारांशी संवाद साधला नाही. मात्र, दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे छायाचित्र घेण्यासाठी होकार दिला. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांची भेट घेतल्यानंतर २४ तासांतच त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांची भेट घेतली. युक्रेनमध्ये शांतता करारासंबंधी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
अमेरिकेच्या करधोरणाला जगभरातून विरोध होत आहे. आग्नेय आशियायी देशांच्या परिषदेतही रुबिओ यांना याविषयी तक्रारी ऐकण्यास मिळाल्या. असे असले, तरी या परिषदेत प्रामुख्याने सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्या. अमेरिकेला विविध देशांकडून सहकार्य कसे मिळेल, यावर रुबिओ यांचे लक्ष केंद्रित होते. केवळ करांच्या मुद्द्यांवरून आंतरराष्ट्रीय संबंध ठरत नाहीत, असे रुबिओ म्हणाले.