अफगाणिस्तानातील नाटय़ानंतर आता पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांकडून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी भारतात अमेरिकेचा लष्करी तळ आणि गुप्तचर यंत्रणा उभारता येणे शक्य आहे का, याबाबत अमेरिकेने भारताशी सार्वत्रिक निवडणुकीनंतर चर्चा करावी, असे मत काही विचारवंतांनी व्यक्त केले आहे.
प्रादेशिक तणाव आणि हिंसाचार कमी करण्यासाठी अमेरिकेने भारत, चीन आणि पाकिस्तानशी राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू करावी, अशी शिफारसही करण्यात आली आहे. ‘रीओरिएण्टिग यूएस पाकिस्तान स्ट्रॅटेजी : फ्रॉम अफगाणिस्तान-पाक टू एशिया’ या मथळ्याखाली एक विशेष अहवाल ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ने प्रसिद्ध केला असून त्यामध्ये ही शिफारस करण्यात आली आहे.
भारताच्या पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारासमवेत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी चर्चेला सुरुवात करावी आणि दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठीच्या पर्यायांचा विचार करावा. भारतात अमेरिकेचा लष्करी तळ अथवा गुप्तचर यंत्रणेचे जाळे उभारण्याबाबतची शक्यताही पडताळून पाहावी, असे हा अहवाल लिहिणारे डॅनिअल मार्के यांनी म्हटले आहे. अशा प्रकारची चर्चा राजकीयदृष्टय़ा संवेदनक्षम असल्याने भारतातील सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर चर्चेला सुरुवात केली पाहिजे. या चर्चेतून प्रगती झाली तर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेसमवेत लष्कराच्या मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी त्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करून योजना आखावी, असेही मार्के यांनी म्हटले आहे.