न्यू यॉर्क : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने भारताकडे प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली. गंभीर आजार असल्याचा तसेच भारतात छळ होण्याची शक्यताही त्याने या याचिकेमध्ये व्यक्त केली होती तथापि, न्यायाधीशांनी ती याचिका फेटाळली. दरम्यान, याचिका फेटाळल्यानंतर मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्यासमोर नवीन याचिका दाखल केली आहे. राणा ज्याच्याकडे पाकिस्तानी व कॅनडाचे नागरिकत्व आहे, तो सध्या महानगरातील बंदिगृहात आहे.
२७ फेब्रुवारी रोजी, राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सहयोगी न्यायाधीश आणि नवव्या सर्किटच्या न्यायाधीश एलेना कागन यांच्यासमोर खटल्याच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यासाठी आपत्कालीन अर्ज दाखल केला होता.तथापि, कागन यांनी राणाचा अर्ज फेटाळला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर ६ मार्च रोजी प्रकाशित झालेल्या एका पत्रात नमूद केले आहे.
गंभीर आजारांचे कारणही फेटाळले
याचिकेत राणाने भारतात प्रत्यार्पण करणे हे अमेरिकन कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या छळाविरुद्धच्या कराराचे उल्लंघन असल्याचा उल्लेख केला होता. भारताकडे प्रत्यार्पण केल्यास तेथे छळ होण्याची शक्यता व्यक्त करतानाच त्याने पाकिस्तानी वंशाचा मुस्लीम तसेच मुंबई हल्ल्यातील आरोपी असल्याचे नमूद केले होते. यासोबतच त्याने गंभीर वैद्याकीय स्थितीचा दाखला देत प्रत्यार्पण मृत्युदंडच ठरत असल्याचाही युक्तिवाद केला आहे. यासंदर्भात त्याने जुलै २०२४ च्या वैद्याकीय नोंदींचा दाखला दिला असून त्यात हृदयविकारासह मूत्राशय कर्करोगाचेही कारण दिले होते, तथापि न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली.