India US Trade Talks Halted: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचा दौरा करत व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू केली होती. त्यानंतर भारत आणि अमेरिकेत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या होत्या. सहावी फेरी ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस भारतात होणार होती. मात्र आता वॉशिंग्टन डीसीच्या अधिकाऱ्यांचा भारत दौरा अमेरिकेने सध्यासाठी थांबवला आहे. या करारावर लक्ष असलेल्या सूत्रांनी ही माहिती द इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर ५० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. जागतिक स्तरावर कोणत्याही देशांपेक्षा हा सर्वाधिक टॅरिफ आहे. दरम्यान २५ टक्के टॅरिफ आधीच अमलात आलेले आहे. तर रशियाकडून तेल आयात करत असल्यामुळे अतिरिक्त २५ टक्के आणखी टॅरिफ लावला जाणार आहे. परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भू-राजकीय घटना कशा घडतात, यावर हा निर्णय अवलंबून असेल.
द इंडियन एक्सप्रेसने ८ ऑगस्ट रोजी अमेरिकन व्यापार पथकाचा दौरा अनिश्चित असल्याचे वृत्त दिले होते. कारण तोपर्यंत अमेरिकन पथकाकडून त्यांच्याकडून कोणताही औपचारिक संपर्क झाला नव्हता.
कृषी करार रखडला
कृषी क्षेत्रात अमेरिकेला प्रवेश देण्यास भारताने आजवर नकार दिला आहे. शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी भारत दीर्घकाळापासून या भूमिकेवर ठाम आहे. मात्र ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिका त्यांच्या कृषी उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे.
अमेरिकेला भारतातील कृषी आणि दुग्धजन्य बाजारपेठेत प्रवेश हवा असून त्यावरून दोन्ही देशांत वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना सांगितले की, भारत आपले शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांच्या कल्याणाशी तडजोड करणार नाही.
तसेच ७ ऑगस्ट रोजी ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, त्यांना मोठी वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी ते तडजोड करणार नाहीत.
भू-राजकीय घटक
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अलास्का येथे दि. १५ ऑगस्ट रोजी बैठक पार पडली. रशिया-युक्रेन युद्धबंदी बाबत या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही, त्यामुळे भारतावर लादलेले टॅरिफ कमी होण्याची अनिश्चितता कायम आहे.
अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी या बैठकीआधीच इशारा दिला होता की, ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील चर्चेदरम्यान काही गोष्टी मार्गी लागल्या नाहीत तर भारतावरील सेकंडरी टॅरिफ आणखी वाढू शकतो.