गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारणाऱ्या अमेरिकेने आता त्यांच्याशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी भारताचे आगामी पंतप्रधान झाल्यानंतरही अमेरिका व भारत यांच्यातील दृढ संबंध कायम राहावेत यासाठी अमेरिकी उद्योगजगताने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. ‘नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यापारी हितसंबंध दृढ करण्यास आम्ही तयार आहोत,’ अशी भूमिका अमेरिकेने गुरुवारी घेतली.
‘‘नरेंद्र मोदी हे एक सक्षम व्यक्ती आहेत. ते जर भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले, तर व्यापारी हितसंबंध जोपासण्यासाठी कसे प्रयत्न करतात, हे आम्ही पाहणार आहोत,’’ असे अमेरिकेचे प्रशासकीय अधिकारी फ्रँक विजनेर यांनी सांगितले. अमेरिका-भारत संबंध यावर ‘आशिया सोसायटी पॉलिसी इन्स्टिटय़ूट’ने आयोजित केलेल्या परिषदेत विजनेर बोलत होते.
भारतात आगामी सरकार कुणाचे येणार याकडे अमेरिकेचेही लक्ष आहे. मोदी जर सर्वोच्च स्थानी विराजमान झाले, तरी भारताशी व्यापारी संबंध वाढवणे अमेरिकेला अनिवार्य असेल, असे विजनेर यांनी सांगितले. अमेरिकेतील उद्योजकांचीही मोदी सरकारशी व्यापारी संबंध वाढवण्याची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांच्यावर २००२च्या गुजरात दंगलीचा ठपका ठेवण्यात आल्याने अमेरिकेने २००५मध्ये त्यांना अमेरिकेचा व्हिसा देण्यास नकार दिला होता. आपल्या या भूमिकेत अमेरिकेने अद्याप बदल केलेला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2014 रोजी प्रकाशित
मोदींसोबत व्यापारी संबंध दृढ करण्यास अमेरिका तयार
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारणाऱ्या अमेरिकेने आता त्यांच्याशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे.
First published on: 31-01-2014 at 02:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us ties with india too important to be held up on modi issue