US Treasury Secretary warns of more tariffs on India : अमेरिकेने भारतीय मालावर ५० टक्के निर्यातशुल्क लादले आहे. यानंतर आता अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी बुधवारी पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यातील अलास्का येथे होणाऱ्या बैठकीत गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर अमेरिका भारतावरील दुय्यम शुल्क वाढवू शकते असे बेसेंट म्हणाले आहेत. ट्रम्प आणि पुतिन हे दोन नेते १५ ऑगस्ट रोजी अलास्का येथे बैठक घेणार आहेत. या बैठकीत युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध संपवले जाण्याची शक्यता आहे.

ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बेसेंट म्हणाले की, “रशियन तेल विक घेतल्यामुळे आम्ही भारतीयांवर दुय्यम शुल्क लादले आहे. आणि जर गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर निर्बंध आणि शुल्क वाढवले जाऊ शकतात.”

सरूवातीला ट्रम्प यांनी भारतीय मालावर २५ टक्के शुल्क लादले होते. मात्र ७ ऑगस्ट रोज डोनाल़्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याचे सांगत अतिरिक्त २५ टक्के शुल्क लादले. यामुळे भारतावरील एकूण शुल्क हे ५० टक्क्यांवर गेले आहे.

ट्रम्प यांचा रशियालाही इशारा

बुधवारी ट्रम्प यांनी रशियाला देखील इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की जर राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी तुमच्या बैठकीनंतर देखील युद्ध थांबवण्यास सहमती दाखवली नाही तर रशियाला याचे परिणाम भोगावे लागतील का? त्यावर क्षणाचाही विलंब न करता ट्रम्प म्हणाले, येस. जर रशियाने युक्रेनविरोधातलं युद्ध थांबवलं नाही तर त्यांना अत्यंत गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. हे गंभीर परिणाम टॅरिफपासून कठोर निर्बंधांपर्यंत असू शकतात. याबाबत मला सविस्तर काही चर्चा करण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र निश्चितच रशियाने युद्ध थांबवलं नाही तर त्यांना प्रचंड गंभीर परिणाम भोगावे लागतील.

“अध्यक्ष ट्रम्प हे अध्यक्ष पुतिन यांना भेटत आहेत आणि युरोपियन्स हे वाट पाहत, हे कसे केले पाहिजे आणि त्यांनी काय केलं पाहिजे याबद्दल दोष देत आहेत. युरोपीय लोकांनी या निर्बंधांमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे. युरोपीयन लोकांनी हे दुय्यम निर्बंध लादण्याची तयारी दाखवली पाहिजे,” असे बेसेंट म्हणाले.

मोदींची झेलेन्स्की यांच्याशी चर्चा

नाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट होण्यापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ११ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी झेलेन्स्की आणि पंतप्रधान मोदी यांच्यात रशिया-युक्रेनमधील संघर्ष आणि संभाव्य शांतता प्रयत्नासाठी व भारत आणि युक्रेनमधील द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती पंतप्रधान मोदींनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. मोदींनी म्हटलं की, “झेलेन्स्की यांच्याशी बोलून आणि अलीकडील घडामोडींबद्दल त्यांची भूमिका ऐकून आनंद झाला. संघर्षाच्या लवकर आणि शांततापूर्ण निराकरणाबद्दल भारताची सातत्यपूर्ण भूमिका व्यक्त केली. भारत या संदर्भात शक्य तितके सर्व योगदान देण्यास तसेच युक्रेनबरोबर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे.”