वॉशिंग्टन/लंडन : रशियाचा माजी गुप्तहेर आणि त्याच्या कन्येला ठार मारण्यासाठी रशियाने त्यांच्यावर ब्रिटनमध्ये विषारी वायूचा प्रयोग केल्याचे निश्चित झाल्यानंतर आता अमेरिकेने रशियावर नव्याने कडक निर्बंध घालण्याचे ठरविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्जेई स्क्रिपल आणि त्याची कन्या युलिया यांच्यावर मार्च महिन्यात हल्ला करण्यात आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. युलिया हिला एप्रिल महिन्यात रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले तर सर्जेई यांना मे महिन्यांत घरी पाठविण्यात आले होते.

ब्रिटनचे नागरिक असलेल्या या दोघांची हत्या करण्यासाठी ‘नोव्हीचोक’ या विषारी वायूचा प्रयोग करण्यात आल्याने हे निर्बंध घालण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

सॅलिसबरी शहरातील या हत्येच्या प्रयत्नामागे रशिया असल्याचा ब्रिटनने केलेला आरोप रशियाने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून रशियाच्या सरकारने आपल्याच नागरिकांविरुद्ध रासायनिक किंवा जैविक शस्त्रांचा वापर केल्याचे अमेरिकेचे ठाम मत आहे. त्यामुळे जवळपास २२ ऑगस्टपासून हे निर्बंध लादले जातील, अशी शक्यता आहे.

अमेरिकेचे निर्बंध अस्वीकारार्ह

मॉस्को : ब्रिटनमध्ये रशियाच्या माजी हेरावर आणि त्याच्या कन्येवर करण्यात आलेल्या विषारी वायूच्या प्रयोगामध्ये सहभाग असल्याच्या मुद्दय़ावरून अमेरिकेने रशियावर निर्बंध घालण्याचा घेतलेला निर्णय अस्वीकारार्ह असल्याचे रशियाने म्हटले आहे. मात्र वॉिशग्टनसमवेत रचनात्मक संबंध कायम राहतील, अशी रशियाला आशा आहे. या हत्येच्या प्रयत्नांशी आमचा संबंध जोडणे आम्हाला मान्य नाही, तरीही रशियाचे अमेरिकेशी रचनात्मक संबंध राहतील, अशी आशा रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली.

इराणवर पुन्हा कडक आर्थिक निर्बंध

तेहरान : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. इराणच्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खनिज तेल क्षेत्रावरही नोव्हेंबरमध्ये निर्बंध लादण्यात येणार आहेत. इराणसमवेत कोणीही व्यापारी संबंध ठेवू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या र्निबधामुळे इराणमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून अमेरिकेच्या विरोधात संताप आणि साशंकतेची भावना निर्माण झाली आहे. हा दबाव झुगारण्यासाठी जनभावना तीव्र झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us will impose fresh sanctions on russia
First published on: 10-08-2018 at 00:06 IST