कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर केल्याने केवळ एका वर्षात ग्रामीण भागात सुमारे ५० लाख नोकऱ्या निर्माण होऊ शकतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केले. यासंदर्भात गडकरींनी त्यांच्या दोन कॅबिनेट सहकार्‍यांशी शेती क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान वापरण्याबाबत धोरण तयार करण्याच्या गरजेवर चर्चा केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. नागपुरात ‘ऍग्रोव्हिजन’ प्रदर्शनाच्या समारोप समारंभात उपस्थित शेतकरी व इतरांना संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं.

केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी प्रदर्शनाला भेट दिली, तर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी २४ डिसेंबर रोजी या चार दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली होती. यावेळी “मी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांच्याशी कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरासंबंधित धोरण तयार करण्यावर काम करण्यासाठी चर्चा केली,” असेही त्यांनी सांगितले.

“ड्रोनचा कृषी आणि एमएसएमईशी संबंध आहे आणि केवळ ड्रोनमुळे एका वर्षात ग्रामीण क्षेत्रात सुमारे ५० लाख रोजगार निर्माण होऊ शकतात. याचा शेतकऱ्यांनाही फायदा होईल,” असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्या शेतात ड्रोन वापरण्याचे स्वतःचे उदाहरण देत, कीटकनाशकांची फवारणी कमी करण्यावर भर दिला.

लिथियम-आयन बॅटरीने चालणाऱ्या ड्रोनची किंमत सुमारे सहा लाख रुपये असेल, तर फ्लेक्स इंजिन असलेले आणि इथेनॉल इंधनावर चालणारे तेच मानवरहित ड्रोन दीड लाख रुपये इतक्या स्वस्त किंमतीत मिळेल. ड्रोनमधून कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ते ऑपरेट करण्यासाठी पायलट लागतील आणि यामुळे मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असं गडकरी म्हणाले.

गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांनी कीटकनाशके तसेच इतर माती आणि पीक पोषक फवारणीसह शेती क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी मानक कार्यप्रणालीचा संच जारी केला होता.