Crime News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव वापरून १५० पेक्षा अधिक लोकांची १ कोटीपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता अनेक पीडितांनी मदतीसाठी तसेच गमावलेले पैसे परत मिळवण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
डेक्कन हेराल्डच्या रिपोर्टनुसार, कर्नाटक राज्यातील बंगळुरु, तामकुरु, मंगळुरु आणि हवेरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. या लोकांची फसवणूक करण्यासाठी आरोपींनी ‘ट्रम्प हॉटेल रेंटल’ नावाच्या अॅपचा वापर केला, आणि त्यांनी गुंतवलेली रक्कम दुप्पट करण्याचे आश्वासन पीडितांना दिले. इतकेच नाही पीडितांचा विश्वास जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तयार केलेला व्हिडीओ देखील वापरण्यात आला. फसवण्यात आलेल्या लोकांना त्यांच्या गुंतवणुकीचा लवकर आणि मोठा मोबदला दिला जाईल असे सांगण्यात आले होते.
“फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात भरपूर परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, तसेच वर्क फ्रॉम होम करण्याची संधी देण्यात आली होती. एकट्या हावेरीमध्ये अशा १५ हून अधिक लोकांना फसवण्यात आले आहे,” असे हावेरी सायबर क्राइम इकॉनॉमिक्स अँड नार्कोटिक्स (सीईएन) चे इन्स्पेक्टर शिवशंकर आर गणाचारी यांनी डेक्कन हेराल्डला सांगितले .
एका पीडित व्यक्तीने सांगितले की, “आम्हाला खाते उघडण्यासाठी १,५०० रुपये भरण्यास सांगण्यात आले आणि कंपन्यांचे प्रोफाईल लिहिण्यास सांगण्यात आले. अशा प्रकारचे प्रत्येक काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या डॅशबोर्डवर आम्ही कथितपणे कमावलेल्या पैशात वाढ होत होती. पण प्रत्यक्षात मी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे गमावले.”
सायबर गुन्हेगारांविरुद्ध कर्नाटकातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये अशाच प्रकारच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
गृह मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी या गेल्या चार वर्षांत सात पटीने वाढल्या आहेत, २०२० मध्ये या तक्रारी ०.२६ दशलक्ष इतक्या होत्या ज्या २०२३ मध्ये १.५ दशलक्ष इतक्या झाल्या.
अशा फसवणूकीतून मिळणारा मोबदला मोठा असल्याने गेल्या काही दिवसात सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जाते. २०१८-१९ मध्ये अशा प्रत्येक फसवणुकीतून फक्त ३.८ लाख रुपये गुन्हेगारांना मिळू शकत असतील, तर गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रत्येक फसवणुकीच्या प्रकरणात सरासरी पैसे ५ लाख रूपयांपेक्षा जास्त पैसे लुबाडले जात होते.