काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या हरवलेल्या म्हशी शोधून आणाव्या लागल्या होत्या. हे प्रकरण तेव्हा चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेश पोलिसांना आता आणखी एका ‘हाय-प्रोफाईल’ प्राण्याच्या शोधासाठी मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार राम शंकर कथारिया यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याचे अपहरण झाल्याचा दावा केला आहे. त्यासाठी कथारिया यांची पत्नी मृदुला यांनी शुक्रवारी आग्रा येथील पोलीस महासंचालकांकडे जाऊन रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांना आता कुत्रा शोधण्याची मोहीम हाती घ्यावी लागणार आहे.
खासदार किसन कथोरिया यांनी त्यांच्या घरी लॅब्राडोर जातीचे दोन कुत्रे पाळले आहेत. यापैकी एक कुत्रा तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला आहे. जोडीदार हरवल्यामुळे आता दुसरा कुत्रा काहीही खाण्यास तयार नाही. तो फारच अस्वस्थ झाला असल्याचे मृदुला यांनी म्हटले आहे. ही तक्रार पोलिसांनी स्विकारावी म्हणून मृदुला यांनी आझम खान यांच्याकडे बोट दाखवले आहे. पोलीस एका मंत्र्यांची म्हैस शोधू शकतात मग कुत्र्याचा शोध का घेणार नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, मृदुला यांच्या तक्रारीनंतर न्यू आग्रा पोलीस ठाण्याला हरवलेला कुत्रा शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.