Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका टोलनाक्यावर धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. टोलवरील काही कर्मचाऱ्यांनी एका लष्करी जवानाला काठ्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केलं आहे.
नेमकं घटना काय घडली?
मेरठमधील एका टोलनाक्यावरून एक लष्करी जवान ड्युटीवर जाण्यासाठी जात होता. यावेळी त्या जवानाची गाडी टोलनाक्यावर आल्यानंतर तेथील काही कर्मचाऱ्यांबरोबर वाद झाल्याचं बोललं जातं. पण हा वाद एवढा वाढला की वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. तेथील चार ते पाच कर्मचाऱ्यांनी त्या जवानाला काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही मारहाणीची घटना टोलनाक्यावरील कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तात्काळ चार जणांना अटक करण्यात आलं आहे. आणखी एकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय कपिलला त्याचा चुलत भाऊ सुट्टीनंतर पुन्हा ड्युटीवर जाण्यासाठी विमानतळावर सोडण्यासाठी घेऊन जात होता. पण मध्ये एका टोलनाक्यावरून जात असताना मारहाणीची घटना घडली. या जवानावर हल्ला करणाऱ्या पाच टोल कर्मचाऱ्यांपैकी चार जणांना अटक केली असून एकाचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कपिलच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश कुमार मिश्रा यांनी या घटनेबाबत सांगितलं की, “कपिल सैन्यात आहे. तो त्याच्या ड्युटीवर परतत होता. पण भुनी टोलनाक्यावर लांबच लांब रांग लागली होती आणि तो घाईत होता. यावेळी टोलवरील कर्मचाऱ्यांशी बोलला असता वाद सुरू झाला. त्यानंतर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आलं आहे.