उत्तर प्रदेश पोलीस हत्याकांडातील आरोपी विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे विकास दुबेला अटक केल्यानंतर त्याला उत्तर प्रदेशातील कानपूर येथे नेलं जात होतं. विशेष पथक विकास दुबेला घेऊन चाललं होतं. यावेळी ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. विकास दुबे याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुख्यात गुंड विकास दुबेला गुरुवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे विकास दुबेला अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून पोलीस विकास दुबेचा शोध घेत होते. त्याच्यावर पाच लाखांचं बक्षीसदेखील जाहीर करण्यात आलं होतं. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी पकडताच विकास दुबे ‘मी कानपूरचा विकास दुबे’ आहे असं ओरडत होता.

विकास दुबे मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. विकास दुबे हरियाणामधून कसा पळाला याची माहिती अद्याप उघड झालेली नाही. एएनआयने विकास दुबेच्या अटकेचा व्हिडीओ ट्विट केला असून यामध्ये त्याने टी-शर्ट घातलेलं दिसत आहे. मंदिरात जाण्याआधी त्याने पुजेचं सामान विकत घेतलं होतं. यावेळी दुकानदाराने त्याला ओळखलं आणि सुरक्षा रक्षकांना सांगितलं. विकास दुबे बाहेर आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला विचारणा केली.

यानंतर वेगाने घडामोडी घडल्या आणि पोलिसांनी विकास दुबेला अटक केली. विकास दुबे याची सुरक्षा रक्षकांसोबत बाचाबाची तसंच हाणामारीदेखील झाली. यानंतर त्याला पोलिसांकडे सोपवण्यात आलं.

२ जुलै रोजी उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेला अटक करण्यासाठी कानपूर येथे गेले असता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला  होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. पोलिसांनी तपासादरम्यान विकास दुबेच्या काही साथीदारांना ठार केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh vikas dubey special task force stf kanpur sgy
First published on: 10-07-2020 at 07:38 IST