देशातील खाप पंचायतींविरोधात सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली असतानाच उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये पंचायतीच्या आदेशानंतर एका तरुणाने त्याच्या पत्नीला भरचौकात पट्ट्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीला झाडाला बांधून तिला पट्ट्याने मारहाण करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

बुलंदशहर जिल्ह्यात झाडाला बांधलेल्या महिलेला तिचा पती चामडी पट्ट्याने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जवळपास ७० सेकंदाच्या या व्हिडिओत पती अमानूषपणे पत्नीला पट्ट्याने मारताना दिसत होता. भरचौकात हा सर्व प्रकार सुरु होता. त्यांच्या बाजूला ग्रामस्थही मोठ्या संख्येने जमल्याचे दिसत होते. हे प्रकरण शेवटी पोलिसांकडे गेले आणि पोलिसांनी तपास सुरु केला. शेवटी हे प्रकरण नेमके कुठे घडले, याचा उलगडा झाला.

लौंगा गावात राहणारी २० वर्षांची विवाहित महिला तिच्या शेजारी राहणाऱ्या धर्मेंद्र लोधी नामक तरुणासोबत पळाली होती. ५ मार्च रोजी त्यांनी पळ काढला होता. पाच दिवस ते दुसऱ्या गावात एका नातेवाईकाच्या घरात थांबले होते. पाच दिवसांनी लौंगा गावातील काही जण त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी दोघांनाही गावी परतण्यास राजी केले. गावी येताच माजी सरपंच शेरसिंह व त्याचा मुलगा श्रावण सिंह यांनी पंचायत बसवली. यात त्यांनी महिलेला तिच्या पतीने भरचौकात पट्ट्याने मारहाण करण्याचा फतवा जारी केला. १० मार्च रोजीच तिला पतीने भरचौकात पट्ट्याने मारहाण केली. शेरसिंहने त्याच्या एका साथीदाराला या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सांगितले. ‘पुन्हा कोणत्याही महिलेने दुसऱ्या पुरुषासोबत पळण्याचे धाडस करु नये’, असे त्याने म्हटले होते. पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेचा जबाब घेतला आहे. या आधारे पोलिसांनी तिचा पती शौदनसिंह, माजी सरपंच शेरसिंह आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे. मारहाणीनंतर माजी सरपंचाने तिला एका खोलीत नेऊन तिच्याशी असभ्य वर्तनही केले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.