उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची मंगळवारी रात्री सुटका झाली आणि देशाने सुटकेचा निःश्वास सोडला. चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या पाच किलोमीटरच्या बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग १२ नोव्हेंबर रोजी खोदकामाचं काम चालू असताना कोसळला. बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे ६० मीटरचा भाग खचल्याने ४१ कामगार आत अडकले होते. बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या दोन किलोमीटर भागात हे कामगार अडकले होते. या ४१ कामगारांना तब्बल १७ दिवसांनी सुखरूप बाहेर काढण्यात बचावपथकांना यश आलं.

झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील मजूर या चारधाम राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पासाठी काम करत आहेत. सिलक्यारा बोगदा हा याच १.५ बिलियन डॉलर्स इतकं बजेट असलेल्या प्रकल्पाचा भाग आहे. इतक्या मोठ्या प्रकल्पात काम करणाऱ्या या मजुरांना किती पगार किंवा भत्ता मिळत असेल याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. या मजुरांच्या पगाराची माहिती नुकतीच समोर आली आहे.

सिलक्यारा बोगद्याचं काम चालू असताना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता ही दुर्घटना घडली. त्यानंतर काही तासांत ही बातमी देशभर पसरली. मजुरांच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांनादेखील याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सगळ्यांचा जीव टांगणीला लागला. या मजुरांच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेल्या कुटुंबीयांनी उत्तरकाशीला जाण्याचा विचार केला. परंतु, अनेकांकडे उत्तरकाशीला जाण्यासाठी रेल्वेचं तिकीट काढण्याचे पैसे नव्हते. तसेच हे मजूर किती दिवसांत बाहेर येतील हेदेखील सांगता येत नव्हतं.

दुर्घटनेची बातमी कळताच अनेक मजुरांच्या कुटुंबीयांनी पैसे उधार घेऊन, घरातली एखादी मौल्यवान वस्तू विकून पेसे मिळताच उत्तरकाशी गाठली. उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमधील अखिलेश कुमार यांची कहानीदेखील अशीच आहे. त्यांनीदेखील पत्नीचा दागिना विकून पैसे मिळताच ते उत्तरकाशीत दाखल झाले. त्यांचा मुलगा या बोगद्यात अडकला होता. झारखंडमधील अनिल नावाचा मजूरही या बोगद्यात अडकला होता. त्याच्या कुटुंबीयांनीदेखील अशाच प्रकारे पैसे मिळवून उत्तरकाशी गाठली होती. यूपीचे अखिलेश कुमार असो अथवा झारखंडचा अनिल, यांच्याकडे राहायला पक्कं घरदेखील नाही.

हे ही वाचा >> Uttarkashi Tunnel Rescue: “आम्ही अडकलो तेव्हा सुरुवातीचे २४ तास…”, कामगाराने सांगितला ‘तो’ अनुभव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोगद्यात अडकलेल्या मजुरांपैकी १५ मजूर हे झारखंडचे आहेत, तर उत्तर प्रदेशमधील आठ, ओडिशा आणि बिहारमधील प्रत्येकी पाच, पश्चिम बंगालचे तीन, आसाम आणि उत्तराखंडचे प्रत्येकी दोन आणि एक मजूर हा हिमाचल प्रदेशमधील आहे. हे मजूर वेगवेगळ्या राज्यांमधील असले तरी त्यांचं उत्तकाशीला जाण्याचं एकच कारण होतं. ते म्हणजे घरची हालकीची परिस्थिती. केवळ काही पैशांसाठी हे मजूर जीव धोक्यात घालून काम करत आहेत. बोगद्याचं काम करणाऱ्या मजुरांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी कुशल कामगारांना दरमहा २४ हजार रुपये इतकं वेतन दिलं जातं. तर अकुशल कामगार जसे की पंपचालक, खोदकाम करणारे कामगार यांना प्रति महिना १८ हजार रुपये इतकं वेतन दिलं जातं.