Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना तब्बल १७ दिवसांनी बाहेर काढण्यात यश आलं आहे. या अतिमहत्त्वाच्या आणि आव्हानात्मक ठरलेल्या मोहिमेसाठी देशातील विविध यंत्रणा कार्यरत होत्या. तसंच, अनेक आंतरराष्ट्रीय यंत्रणांनीही त्यांचे प्रयत्न पणाला लावले होते. आता या बोगद्यातून सुखरुप बाहेर पडलेले कामगार हे त्यांचा अनुभव सांगत आहेत. सुबोध कुमार वर्मा या कामगाराने ते १७ दिवस कसे होते? त्याचा अनुभव सांगितला आहे.
काय सांगितलं आहे सुबोध कुमार वर्माने?
“मी सुबोध कुमार वर्मा, मी झारखंडचा आहे. मी उत्तरकाशीच्या बोगद्यात १७ दिवस माझ्या सहकाऱ्यांसह अडकलो होतो. आम्हा सगळ्यांसाठी सुरुवातीचे २४ तास हे अत्यंत जिकिरीचे होते. काय होईल सांगता येत नव्हतं. आम्हाला काही खायलाही मिळालं नाही. मात्र त्यानंतर आमच्या कंपनीने पाईपद्वारे खाण्यासाठी काजू, बदाम, किसमिस, पुडिंग जे शक्य होतं ते पाठवलं. दहा दिवसांनी आम्हाला वरण-भात, पोळी भाजी हे जेवणही मिळालं. मला कंपनीबाबत काहीही तक्रार नाही. मी व्यवस्थित आहे. सुरुवातीचे २४ तास मात्र खूपच वेदनादायी होते. आत काय होईल याचा अंदाजच आम्हाला येत नव्हता. आता मात्र सगळ्यांची दुवा असल्याने मी आणि माझे सगळे सहकारी बाहेर आलो आहोत.” असं सुबोध कुमार वर्माने म्हटलं आहे.
४१ कामगारांची सुखरुप सुटका
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्हि. के. सिंह यांनी सुटलेल्या कामगारांची भेट घेतली. बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यासाठी बोगद्याबाहेरच जवळपास ४० रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. सर्व कामागारंची प्रकृती उत्तम असल्याचीही माहिती देण्यात आली.
कामगार बोगद्यात अडकल्यापासून सातत्याने त्यांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू होते. बोगद्यातील ढिगाऱ्यात खोदकाम करण्यासाठी ऑगर मशीन मागवण्यात आले होते. परंतु, हे मशीन सातत्याने नादुरुस्त होत होते. अखेर हे मशीन निकामी झाले. त्यामुळे, यंत्राची मदत न घेता कामगारांमार्फत खोदकाम करण्याबरोबरच अन्य पर्यायांचा विचार सुरू असल्याचे आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी शनिवारी सांगितलं होतं. आता सर्वच्या सर्व कामगारांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.