Kheerganga Landslide : उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान, उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसानंतर अचानक पूर आल्यामुळे भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये अनेक हॉटेल आणि घरं वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.

ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसानंतर धरालीमध्ये बचाव पथके दाखल झाली असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. भारतीय लष्कर, राज्य आपत्ती दलाचे जवान आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य करत आहेत. ज्या ठिकाणी ही घटना घडली, हा परिसर हर्षिलपासून १० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांच्या मते या भागात झालेल्या ढगफुटीमुळे अचानक पूर आला आहे. त्यामुळे या भागातील नदीकाठी असलेले काही हॉटेल्स आणि दुकान आणि काही घरे वाहून गेल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. मात्र, किती नुकसान झालं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण प्राथमिक माहितीनुसार येथील मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचं जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

तसेच उपजिल्हाधिकारी शालिनी नेगी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, या घटनेत जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप आमच्याकडे सविस्तर माहिती आलेली नाही. आम्ही त्या भागात पोहोचत आहोत, असं त्यांनी सांहितलं. दरम्यान, जेव्हा पूर आला तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे नुकसान झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

४ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

उत्तराखंडच्या धराली गावात ढगफुटी झाल्यामुळे अचानक आलेल्या पुरामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती सांगितली जात आहे. युद्धपातळीवर मदत कार्य सरू असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे. मुख्यमंत्री धामी यांनी म्हटलं की, “घटना घडल्यानंतर तेथील नागरिकांचं तात्काळ स्थलांतर केलं जात आहे. परिस्थितीवर सरकार लक्ष ठेऊन आहे. तसेच राज्य सरकारच्या देखरेखीखाली मदत आणि बचावकार्य सुरू आहे. लोकांना मदत करण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही”, असं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं?

उत्तरकाशीतील धरालीच्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी संपर्क साधत घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, “उत्तरकाशीतील धाराली येथील दुर्घटनेत बाधित झालेल्या लोकांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. तसेच मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी संवाद साधून मी परिस्थितीची माहिती घेतली आहे.”