अमेरिकेतील लस घेतलेल्या नागरिकांनाही पुन्हा घालावा लागणार मास्क; आरोग्य प्रशासनाचे निर्देश

अमेरिकेत करोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे

US, USA, Mask, Vaccination.
अमेरिकेत करोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे (File Photo: Reuters)

अमेरिकेत करोनाचा सर्वात जास्त धोका असणाऱ्या भागांमधील लस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा एकदा मास्क घालावा लागणार आहे. आरोग्य प्रशासनाने लसीकरण झालेल्या या नागरिकांना मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. करोना विषाणूंमध्ये सतत बदल होत असल्याने आणि डेल्टा व्हेरियंटवर मात करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (Centers for Disease Control and Prevention) संचालकांनी पत्रकार परिषदेत मास्क वापरण्यासंबंधी निर्देश दिले. डेटानुसार लस अत्यंत प्रभावी आहे, मात्र डेल्टाच्या काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

“संसर्गाचं प्रमाण जास्त तसंच धोकादायक ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्यांनी घरांमध्येही मास्क वापरण्याची शिफारस सीडीसी करत आहे,” असं त्यांनी सांगितलं. सीडीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील दक्षिण भागात संक्रमणाचं प्रमाण अधिक आहे. तर दुसरीकडे ईशान्येकडील लसीकरण झालेल्या भागांमध्ये संक्रमणाचा मध्यम स्तरावर आहे.

सीडीसीने आपल्या संशोधनात दावा केला आहे, लस घेतलेले नागरिक जेव्हा संक्रमित होतात तेव्हा त्यांचा व्हायरल लोड लस न घेणाऱ्यांइतकाच असतो. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, या संशोधनानंतर असं म्हटलं जाऊ शकतं की लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिकही इतरांना संक्रमित करु शकतात.

सीडीसीने मे महिन्यात लस घेतलेल्या लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तसंच रुग्णालयात जाताना मास्कचा वापर करा असं सीडीसीने सांगितलं होतं.

अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये ६० हजारांहून अधिक प्रकरणं समोर आली असून पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर गेला आहे.

लसीकरणासाठी जो बाडयन यांचा प्रयत्न

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी लसीकरणामध्ये आपण अजून चांगली कामगिरी करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. जो बायडन यांनी लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी नवे निर्णय घेतले जाणार असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही देशापेक्षा जास्त प्रमाणात लसींचा पुरवठा होत असतानाही अमेरिकेत अनेक महिन्यांपासून लसीकरणाचे वेग मंदावला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vaccinated people in high covid risk areas of us need to mask again sgy