करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन कागदपत्रांची वैधता पुन्हा एकदा वाढवण्याचा वाहनधारकांना दिलासादायक निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर मोटार वाहनाशी संबंधित तुमचे कोणतेही कागदपत्र कालबाह्य झाले असतील किंवा होणार असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण या निर्णयामुळे तुम्ही 31 डिसेंबर 2020 पर्यंत त्याचे नूतनीकरण करू शकणार आहात. 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य होणाऱ्या किंवा आतापासून 31 डिसेंबरपर्यंत कालबाह्य होणाऱ्या मोटार वाहन कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा विमा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे किंवा देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांचं नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत, अशा वाहनधारकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, PUCसारख्या कागदपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी ते 31 डिसेंबरच्या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

देशव्यापी लॉकडाउनमुळे मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने यापूर्वी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, ती मुदतवाढ नंतर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Validity of driving licences and motor vehicle documents extended till 31 dec check details sas
First published on: 25-08-2020 at 08:11 IST